लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई, श्रीमंत-गरीब दरीतून निर्माण झालेले दोन ‘भारत’ राज्यांच्या अधिकारावरील गदा आणून ‘सम्राट’ बनण्याची प्रवृत्ती अशा वेगवेगळय़ा वादग्रस्त मुद्दय़ांना हात घातला. केंद्र सरकारच्या परराष्ट्रनितीचे राहुल गांधी वाभाडे काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन-पाकला एकत्र येऊ देण्याच्या केंद्राच्या घोडचुकीमुळे देशाला धोका; सरकारच्या परराष्ट्रनीतीवर राहुल गांधींची परखड टीका

चीन आणि पाकिस्तानला आपल्या विरोधात एकत्र येऊ देण्याची घोडचूक केंद्राच्या परराष्ट्र धोरणाने केली आहे. भाजपा देशाच्या सुरक्षेशी खेळत आहात, नागरिकांना धोक्याच्या खाईत लोटत आहात. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ‘पेगॅसस’चा गैरवापर करून लोकांचा विरोधी आवाज दाबून टाकत आहात. देश बाहेरून आणि आतूनही पोखरला जात आहे. आमचे ऐका, ‘शहेनशाही’ प्रवत्ती दाखवून लोकशाही-संघराज्य नष्ट करू नका, असा सज्जड इशारा राहुल गांधी यांनी भाषणात दिला.

Video : “तुम्ही माझा अपमान करा, मला फरक पडत नाही, पण…”; संसदेत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा!

दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा खासदार कमलेश पासवान यांना एक चांगले दलित नेते असून चुकीच्या पक्षात असल्याचं म्हटलं. राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे दिलेल्या ऑफरवर भाजपा खासदार कमलेश पासवान यांनीदेखील नंतर उत्तर देत आपल्याला आनंदी ठेवू शकतील इतकी यांच्या पक्षाची स्थिती नाही असं म्हटलं.

“६० वर्ष काँग्रेसच्या सरकारने काय केलं?”

बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भाजपाकडून उत्तर प्रदेशच्या बासगावचे खासदार कमलेश पासवान यांनी अनुमोदनाचे भाषण करताना मोदी आणि योगी सरकारच्या कामांची माहिती देत काँग्रसेच्या सरकारांवर निशाणा साधला. पासवान यांनी राहुल गांधींना ६० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशातील जनतेला मुलभूत सुविधा का दिल्या नाहीत? गरिबी हटावच्या घोषणा देणाऱ्या काँग्रेसने गरिबांचं आयुष्य सुधारण्यासाठी काय केलं? अशी विचारणा केली.

राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी लगेच उभे राहिले कमलेश

कमलेश पासवान यांचं बोलून झाल्यानंतर राहुल गांधींनी पासवान यांच्या मतदारसंघातील दलितांची स्थिती आणि इतिहासाचा उल्लेख करत ते एक चांगले नेता आहेत, मात्र चुकीच्या पक्षात आहेत असं म्हटलं. “पासवान हे अनुसूचित जातीतून आले आहेत. त्यांचा मला अभिमान वाटतो. दलितांवर झालेल्या ३ हजार वर्षांचा इतिहास त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते चुकीच्या पक्षात आहेत,” असं राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी इशारा करताना जुन्या संभाषणाचा दाखला दिला. यानंतर कलमेश पासवान लगेच राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही.

“मला आनंदी करेल इतकी काँग्रेसमध्ये क्षमता नाही”

राहुल गांधींचं भाषण संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी जेव्हा कमलेश पासवान यांना बोलण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी काँग्रेसची सरकारं फूट पाडा आणि राज्य करा धोरणं राबवत असल्याचा आरोप करत म्हटलं की, भाजपाने त्यांना खूप काही दिलं आहे. तीन वेळा खासदार बनवलं असून यांच्या पक्षाची (काँग्रेसची) इतकी क्षमता नाही की ते मला पक्षात घेऊन आनंदी ठेवू शकतील. काँग्रेसचे दलितांबद्दल धोरण काय आहे, हेही मला माहीत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर पासवान यांनी दिले.

“माझ्या वडिलांची हत्या झाल्याने मलाही ते दु:ख माहितीये”

“मला हे समजतंय. तुम्ही कदाचित ते मान्य करणार नाहीत. पण माझ्या पणजोबांनी हा देश उभा करताना १५ वर्ष तुरुंगात काढली. माझ्या आजीवर ३२ गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझ्या वडिलांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. त्यामुळे मी या देशाला थोडंफार ओळखतो. माझ्या पणजोबांनी, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी या देशासाठी रक्त सांडलं आहे. तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे की थांबा. कारण जर तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही समस्या निर्माण कराल”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. यावर पासवान यांनी माझ्या वडिलांची हत्या झाल्याने मलाही हे दु:ख माहिती असल्याचं उत्तर राहुल गांधींना दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament winter session congress rahul gandhi president speech bjp mp kamalesh paswan dalit up sgy
First published on: 03-02-2022 at 09:05 IST