पंजाबमधील नाभा तुरूंग फोडून एका दहशतवाद्यासह ६ आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एकाला शामली येथून अटक केली. परमिंदर सिंग असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वी परमिंदरही नाभा तुरूंगातून पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांकडून इतर फरार कैद्यांचा शोध सुरू आहे. पंजाबमधील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नाभा तुरूंगातून १० सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करत खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या एका दहशतवाद्यासह ६ आरोपींना घेऊन पसार झाले होते.

याचदरम्यान तुरूंगावरील हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारने कारवाई करत तुरूंग महानिरीक्षकांसहित अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तुरुंगात घुसलेल्या १० हल्लेखोरांनी तब्बल १०० गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिस प्रशासन यासंदर्भात अधिक चौकशी करत आहे. राज्याचे पोलिस अधिक्षक एस एस ढिल्लन यांनी तुरुंगात घडलेल्या या प्रकाराला पुष्टी दिली आहे. पोलिसांनी तुरुंग परिसराला घेराव घातला असून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. नाभा तुरुंगावरील हल्ल्यानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.