एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने कॉकपिटचं दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाल्याचं पाहण्यास मिळालं. विशेष बाब म्हणजे या प्रवाशाने योग्य पासकोडही टाइप केला. मात्र विमानाचं अपहरण होतंय की काय? अशी धास्ती वाटल्याने कॅप्टनने दरवाजा उघडला नाही. ज्या प्रवाशाने हा प्रयत्न केला तो इतर आठ जणांसह प्रवास करत होता. एअर इंडियाचं हे विमान बंगळुरुहून वाराणसीला जात असताना ही घटना घडली.

एअर इंडियाने काय माहिती दिली?

एअर इंडियाने याबाबत माहिती देत सांगितलं की वाराणसीसाठी आमच्या विमानाने बंगळुरुहून उड्डाण केलं होतं. त्यावेळी स्वच्छतागृहात जाण्यासाठी ते शोधत एक प्रवासी कॉकपिटपर्यंत पोहचला. कॉकपिटचं दार उघडण्याचा प्रयत्न त्याने केला. यात आमचे कर्मचारी, हवाई सुंदरी किंवा वैमानिक यांची कुणाचाही काहीही चूक नव्हती. हे सगळं अनावधानाने घडलं. विमान लँड करताना ही माहिती वैमानिकाने दिली. आम्ही त्यानंतर या घटनेची चौकशी करतो आहेत.

विमानात काही काळासाठी तणाव

एअर इंडियाने हे देखील सांगितलं की स्वच्छतागृह शोधत असताना हा प्रवासी कॉकपिटपर्यंत पोहचला होता. मात्र आता सोशल मीडियावर हा प्रश्न उपस्थित होतो आहे की या प्रवाशाला कॉकपिटचा पासकोड कसा काय समजला? एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनीही घडलेल्या प्रकरणाची पुष्टी केली आहे. IX1086 या क्रमांकाचं फ्लाईट सकाळी ८ वाजता बंगळुरुहून वाराणसीसाठी निघालं होतं. विमानाने उड्डाण केलेलं असतानाच हा प्रवासी जागेवरुन उठला आणि थेट कॉकपिटपर्यंत जाऊन पोहचला. त्याने पासवर्डही योग्य टाइप केला. सुरुवातीला केबीन क्रूला भीती वाटली. पण या माणसाला वॉशरुमला जायचं होतं. ते कळल्यानंतर मग प्रकरण निवळलं. पण काही काळ विमानात तणाव निर्माण झाला होता. ही सगळी घटना घडूनही विमान योग्य वेळेत वाराणसीला पोहचलं. यानंतर या प्रवाशाबाबत माहिती देण्यात आली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न प्रवाशाने केल्यास दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद

भारतीय उड्डाण सेवेच्या नियमांनुसार एखादा प्रवासी जर जबरदस्ती कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. कारण विमानातील प्रोटोकॉलच्या विरोधातलं हे वर्तन ठरतं. तसंच आयुष्यभरासाठी अशा प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येतं. त्यामुळे असा प्रयत्न एखाद्या प्रवाशाने केला तर त्यानंतर त्याला आयुष्यभर विमान प्रवास करता येत नाही.