पीटीआय, नवी दिल्ली

G20 Summit Delhi 2023 जी-२० समूह मानवकेंद्रित तसेच सर्वसमावेशक विकासाचा नवा मार्ग आखून देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करत, तळागाळातील व्यक्तींची सेवा करण्याच्या त्यांच्या उदात्त कार्यावरूनच आम्ही वाटचाल करत आहोत असे पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरून स्पष्ट केले. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वसुधैव कुटुंबकम् ही या परिषदेची संकल्पना आहे. त्यानुसार जग म्हणजे एक कुटुंब अशी आमची भावना आहे. भारताकडे आलेले अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी तसेच निर्णायक व कृतीप्रवण असे आहे. विकासाला बाधा आणणाऱ्या गोष्टींबद्दल आम्ही आवाज उठवत आहोत असे पंतप्रधानांनी नमूद केले. मैत्रीचे बंध विस्तारण्यासाठी प्रस्तावित द्विपक्षीय बैठकांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांना आमचे आदरातिथ्य आवडेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. दहा सप्टेंबरला सर्व नेते राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहणार आहेत. पर्यावरण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या क्षेत्रांत भविष्यातील प्रगतीच्या नव्या वाटा प्रशस्त होतील. महिला सशक्तीकरण, लिंगसमानता आणि जागतिक शांततेसाठी सामूहिक प्रयत्नांचा निर्धार यानिमित्ताने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.