China Covid Explosion: चीनमध्ये करोना संकटाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीनमधील सरकारी यंत्रणा जरी अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून चीनमधील नेमकी परिस्थिती काय आहे याची दाहकता या व्हायरल झालेल्या कंटेटंवरुन दिसत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना जमीनीवरच सीपीआर दिला जात आहे. अती जास्त काम केल्याने डॉक्टर चक्कर येऊन पडत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमीनीवर झोपवून उपचार

एका क्लिपमध्ये आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण कक्ष म्हणून रुग्णालयातील राखीव खोलीमधील परिस्थिती दिसत आहे. चाँगइंग नावाच्या शहरातील रुग्णालयामधील हा व्हिडीओ असून अनेक रुग्णांना थेट जमीनीवर झोपवून उपचार केले जात आहे. बेड्सचा तुटवडा असल्याने थेट जमीनीवरच रुग्णांना चेस्ट कम्पेशन मशीन लावल्याचं दिसत आहे. डॉक्टर्स आणि बेड्सच्या तुलनेत रुग्णांची संख्या अनेक पटींनी अधिक असल्याचं ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

…अन् डॉक्टरच पडला

अनेक रुग्णालयांमधील सर्व बेड्स भरलेले असून अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये मिळेल त्या जागेवर रुग्णांना झोपवून त्यांना सलाइन लावण्यापासून ते व्हेंटिलेटर्स लावले जात असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. अन्य एका व्हायरल व्हिडीओमध्ये न झोपता काम करणारा एक डॉक्टर रुग्णांची तपासणी करता करताच झोपी गेल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी डॉक्टरच चक्कर येऊन पडल्याच्या घटना घडल्याचे दावेही केले जात आहेत.

नक्की वाचा >> Bharat Jodo Yatra: “…नाहीतर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करा”; ‘राष्ट्रहिता’चा उल्लेख करत मोदी सरकारचं राहुल गांधींना पत्र

करोनाच्या प्रादुर्भावात वाढ अपेक्षित

चीनमध्ये सोमवारी दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अनधिकृत वृत्तानुसार चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचे अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. सोमवारी झालेले दोन्ही मृत्यू बीजिंगमध्ये झाले आहेत. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यानंतर पहिल्या आठवडय़ात या दोन मृत्यूंची नोंद झाली. हे धोरण शिथील झाल्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावात वाढ अपेक्षित होतीच. मात्र, मृत रुग्णांचे नातलग व अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यास दुजोरा दिला. सरकारकडून कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपले नाव गुप्त राखण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

मृत्यूंची नोंद करण्याची पद्धत वादात

चीनमध्ये ४ डिसेंबरपासून करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. या मृत्यूंमुळे, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गेल्या तीन वर्षांत चीनमध्ये कोविड-१९ मुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या पाच हजार २३७ वर गेली आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण तीन लाख ८० हजार ४५३ करोना रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही संख्या इतर प्रमुख करोनाबाधित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. परंतु, ही माहिती नोंदवण्याची पद्धत व आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी जागतिक स्तरावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. चीनचे आरोग्य अधिकारी केवळ थेट करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची करोना मृत्यू म्हणून गणना करतात. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना करोना  झाल्यास त्यांच्या मृत्यूची जोखीम वाढते. बहुसंख्य देशांतील करोनाविषयी मार्गदर्शक तत्त्वांनुसार या रुग्णांचाही समावेश करोना मृत्यूंमध्ये केला जातो.

मोठा करोना लाटेची शक्यता

चीनमध्ये अपुऱ्या माहिती व आकडेवारीमुळे करोनाच्या उद्रेकाची दिशा समजणे अधिक कठीण झाले आहे. तथापि, आर्थिक व्यवहारांतील मोठी घसरण व विषाणू प्रादुर्भावाचे अनधिकृत पुरावे मोठ्या लाटेची चिन्हे दर्शवत आहेत. आरोग्यतज्ञांनी येत्या एक-दोन महिन्यांत या महासाथीची मोठी लाट येण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

करोना वाढण्याची भिती या कारणामुळे…

जानेवारीत चीनमध्ये नवीन चांद्र वर्षांच्या प्रारंभानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. या काळात स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परततील. या काळात उसळलेल्या गर्दीत करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. तसेच लहान शहरे व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर ताण येईल. या सुविधा अपुऱ्या पडण्याची चिंता प्रशासनास सतावत आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात रुग्णालय संख्या वाढवली आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त आजारी कर्मचाऱ्यांचा अपवाद केला गेला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी गंभीर आजारी असल्याशिवाय रुग्णालयात दाखल न होण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patients given cpr on floor doctors collapse from exhaustion as covid sweeps china watch videos scsg
First published on: 21-12-2022 at 12:07 IST