Police crack case of Patna siblings burnt Case Crime News : बिहारची राजधानी पाटणा येथे गुरूवारी दुपारी एका घरात दोन भावंडांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पाटणाच्या जानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागवा गावात ही घटना घडली होती. लल्लन कुमार गुप्ता आणि शोभा देवी यांना त्यांची १५ वर्षीय मुलगी आणि १० वर्षीय मुलगा यांचे जळालेले मृतदेह आढळून आले होते. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

शनिवारी पोलिसांनी दुहेरी हत्याकांड असून याचा उलगडा केल्याचे जाहीर केले. याबरोबरच दोन आरोपींन अटक देखील करण्यात आली आहे. शुभम कुमार आणि त्याचा साथिदार रोशन कुमार अशी दोन आरोपींची नावे आहेत. दोघांचेही वय १९ वर्ष असून ते पीडित कुटुंबाला ओळखत होते आणि त्याच परिसरातील रहिवासी आहेत, अशी माहिती पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कार्तिकेय शर्मा यांनी यांनी दिली.

तपासात असे दिसून आले की शुभम हा या कुटुंबाच्या सतत घरी येत असे आणि किशोरवयीन मुलीबरोबर त्याचे जवळचे संबंध होते. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही आधी एकाच शाळेत शिक्षण घेत होते, पण त्यांचा कुटुंबांना त्यांच्यातील जवळीकता मान्य नव्हती.

नेमकं काय झालं?

ही घटना घडली तेव्हा बहीण-भाऊ शाळेतून दुपारी साडेबाराच्या सुमारास परत आले आणि त्यांच्या घरात ते एकटेच होते. तेव्हा शुभम हा त्यांच्या घरी गेला आणि मुलीने दरवाजा उघडला, असे एसएसपी म्हणाले. यावेळी लहान भाऊ हा झोपलेला होता, असेही त्यांनी सांगितले.

“शुभमने कथितपणे झोपलेल्या मुलावर विटेने हल्ला केला आणि मुलीचा गळा आवळून ठार केले,” असेही एसएसपी म्हणाले.

पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहांवर रॉकेल ओतले आणि आग लावली, त्यानंतर बाहेरून दरवाजा बंद करून आरोपी पळून गेले, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे.. या घटनेच्या तपासादरम्यान, विशेष तपास पथकाचे नेतृत्व शहर पोलिस अधीक्षक (पश्चिम) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) फुलवारीशरीफ दीपक कुमार यांनी केले.

अधिकच्या तपासात अशी माहिती समोर आली की, शुभमने या हत्येची पूर्ण योजना बनवली होती. ” “त्याने बडी खगौल येथील जवळच्या दुकानातून रॉकेल विकत घेतले आणि ते बाटलीत भरून पीडितेच्या घरी घेऊन गेला,” असे शर्मा म्हणाले.

पोलीसांनी नंतर या दुकानदाराची ओळख पटवून त्याची चौकशी केली असता त्याने देखील शुभमला रॉकेल विकल्याचे मान्य केले. यानंतर एसआयटीने शुभम आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या रोशन याला अटक केली.

पोलिसांनी रॉकेलची बाटली आणि तीन मोबाईल फोन देखील सापडले आहेत. पोलीसांच्या मते, पीडित मुलगी दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचा शुभमच्या मनात असलेला राग हे या घटनेचे कारण दिसून येते. एसएसपींनी सांगितले की चौकशीदरम्यान शुभमने गुन्हा कबूल केला असून हत्येची योजना आखल्याचेही मान्य केले आहे.