पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा काश्मीर खोऱ्यात स्वत:ची इको सिस्टम तयार करू पाहत आहे. ही कोणती लोकशाही आहे. ते आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परवानगी देत नाही. कलम ३७० हटवण्यावर चर्चा करू नका असं मला का सांगितलं जात आहे असा सवालही मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. “ते मुस्लीमांना पाकिस्तानी संबोधतात. सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात, राष्ट्राच्या विरोधातील संबोधतात. मग असं असेल तर मला समजत नाही प्रत्येक जण दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे? केवळ भाजपाचे कार्यकर्ते?,” असं म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. मला ताब्यात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आलेल्या वक्तव्यामुळे मी दु:खी आहे. ज्या दिवशी आम्ही डीडीसीच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली, तेव्हापासून प्रशासनाकडून त्रास वाढला आहे. इतकंच काय तर आपल्या उमेदवारांनाही त्रास दिला जात असल्याचं त्या म्हणाल्या.

पीएजीडीच्या उमेदवारांवर निर्बंध घातले जात आहेत. त्यांना प्रचारासाठी बाहेर पडण्याचीही परवानगी दिली जात नाही. अशामध्ये आमचे उमेदवार निवडणुका कशा लढवणार असा सवालही मुफ्ती यांनी यावेळी केला. “ते माझ्या पक्षावर निर्बंध घालू इच्छित आहे. या ठिकाणी कोणतंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जर कोणी काही बोलण्याचा प्रयत्नही केला तर त्याच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत खटला दाखल केला जातो,” असा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp chief mehbooba mufti everyone is terrorist anti national who is hindustani only bjp workers jammu kashmir jud
First published on: 29-11-2020 at 18:23 IST