आजपर्यंत भारतात अनेक निवडणुका झाल्या. यापैकी अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठे यश मिळवले. एका वेळी तर काँग्रेसने ४०० च्या आसपास जागा जिंकल्या होत्या. पण यापैकी कधीही EVM किंवा मतदान प्रक्रियेवर संशय घेण्यात आला नव्हता. विरोधानकांनीही कधी यावर संशय घेतला नव्हता. पण यंदाच्या मतदान प्रक्रियेबाबत बोलायचे झाले, तर सध्या जनतेच्या मनात EVM बाबत आणि मतदान प्रक्रियेबाबत संशय आहे. तसेच विरोधाकांनीदेखील अनेक वेळा याबाबत संशय व्यक्त केला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
गेल्या काही दिवसात मतदान यंत्र आणि मतदानाची यंत्रणा तसेच प्रक्रिया याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आधी जेव्हा जेव्हा लोकसभा निवडणुकीत मोठे किंवा एकतर्फी निकाल हाती आले, तेव्हा कधीही विरोधक किंवा लोकांनी याबाबत प्रश्न विचारले नव्हते. पण आता मात्र पोटनिवडणुकीपासून ते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत सर्व निकालांबाबत EVM वर संशय घेण्यात येत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. मात्र त्यानंतर “सध्या हाती आलेले निकाल हे लोकांनी दिलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल शंका उपस्थित करणे योग्य होणार नाही”, अशी सारवासारव त्यांनी केली.
सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंत:करणापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात प्रचंड कष्ट घेतले, त्यांचेही मी आभार मानतो. pic.twitter.com/Goe0ycjcM2
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 23, 2019
—
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत चार जागा जिंकल्या आहेत. परभणी, माढा मतदारसंघातील सर्व फेऱ्यांची मतदान मोजणी अद्याप बाकी आहे. या मतदारसंघांबाबत मी आशावादी आहे. लोकांनी दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. पराभवाबाबत चिंतन करून लोकांशी संपर्क वाढवू.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 23, 2019
—
निवडणूक झाली आहे, निकाल लागले आहेत. पण आता लक्ष दुष्काळाकडे आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ते पुढेही सुरूच ठेवणार आहोत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 23, 2019
—
निवडणुकीत जागा कमी होण्याबाबत बोलताना पवार म्हणाले की गेल्या वर्षी मोदींची लाट होती असे मानले जात होते. त्यामुळे अनेक उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. पण यंदाचे निकाल पहिले तर अनेक जागांवर जेथे आम्ही पराभूत झालो आहोत किंवा तुलनेने मागे राहिलो आहोत, तेथे आमच्या पराभवाचे अंतर फारच कमी आहे, असेही ते म्हणाले.