पीटीआय, नवी दिल्ली : कुख्यात गुंड व अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर २४ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे मंगळवारी मान्य केले. या दोघांची प्रसारमाध्यमांशी संवाद सुरू असताना शनिवारी प्रयागराज येथे हत्या करण्यात आली होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली. अतिक आणि अशरफ यांच्या हत्येच्या चौकशीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तिवारींनी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. याचिकेत २०१७ पासून उत्तर प्रदेशात झालेल्या १८३ चकमकींचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या गोळीबाराच्या काही तास आधी अतिक अहमदचा मुलगा असद व त्याच्या एका सहकाऱ्यासह १३ एप्रिल रोजी झाशी येथे पोलीस चकमकीत मारले गेले होते व त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सहा वर्षांच्या काळात कथित चकमकीत १८३ कथित गुन्हेगार मारले गेले. त्यात असद व त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.

या याचिकेत नमूद केले, की उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पासून चकमकीत १८३ कथित गुन्हेगार मारले गेले, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस महासंचालकांनी (कायदा-सुव्यवस्था) दिली आहे. या चकमकींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करून कायद्याच्या राज्याचा रक्षणासाठीची मार्गदर्शक तत्त्वे-निर्देश देण्याचे आदेश द्यावेत. अतिक आणि अशरफ यांच्या हत्येचीही चौकशी करावी. अतिकच्या हत्येचा संदर्भ देत याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांच्या अशा कारवाया लोकशाही आणि कायद्याच्या राज्यासाठी गंभीर धोका आहेत. यामुळे पोलिसांचेच राज्य निर्माण होते. लोकशाही समाजात पोलिसांना अंतिम न्यायाचा, शिक्षेचा अधिकार मिळता कामा नये. शिक्षेचा अधिकार फक्त न्यायपालिकेकडे आहे,.

अतिक यांनी सांगितले होते, की कोणतीही दुर्घटना अथवा आपली हत्या झाल्यास माझे हे बंद लिफाफ्यातील पत्र भारताचे सरन्यायाधीश आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावे. अतिक अहमदने मृत्यूपूर्वी सुरक्षा पुरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आपल्यासह आपल्या कुटुंबाला उमेश पाल हत्याप्रकरणात गोवले असून, उत्तर प्रदेश पोलीस बनावट चकमकीत आपली हत्या करतील, असा भीतीही त्याने व्यक्त केली होती.

अतिकच्या वकिलांच्या  घराजवळ गावठी बॉम्बफेक

प्रयागराज : येथे गेल्या शनिवारी हत्या करण्यात आलेला कुख्यात गुंड व राजकारणी अतीक अहमदच्या वकिलांपैकी एकाच्या निवासस्थानाजवळील गल्लीत एक गावठी (देशी बनावटीचा) बॉम्ब मंगळवारी फेकण्यात आला. येथील कतरा परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री-सरन्यायाधीशांना अतिकचे पत्र 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताच्या सरन्यायाधीशांना अतिक अहमदने लिहिलेले पत्र पाठवले जाणार आहे. अतिकने आपला मृत्यू झाल्यास हे पत्र संबंधितांना पाठवण्याची सूचना केली होती, अशी माहिती त्याचे वकील विजय मिश्रा यांनी मंगळवारी दिली. मिश्रा यांनी नमूद केले, की हे बंद लिफाफ्यातील पत्र माझ्याकडे नाही अथवा मी पाठवलेलेही नाही. ते अन्यत्र ठेवलेले आहे. दुसरी कुणी व्यक्ती हे पत्र पाठवणार आहे. मला या पत्रात काय मजकूर आहे, हे ठाऊक नाही.