सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेतेमंडळींची टीका-टिप्पणी चर्चेचा विषय ठरते. तसाच देशभरात वेगवेगळ्या प्रकारे चालणारा प्रचारही चर्चेचा विषय ठरतो. यंदाच्या निवडणुकीत धार्मिक बाबींचा मतं मागण्यासाठी वापर केला जात असल्याचाही आरोप होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधल्या चार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष देवाच्या नावानं मतं नाही तर परीक्षेत गुण मागितले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ते मिळालेही! हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित प्राध्यापकांची नोकरीवरून हकालपट्टी करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशमधील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात घडला आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं असून त्या वृत्तानुसार विद्यापीठाच्याच एका माजी विद्यार्थ्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या परीक्षेत पेपरमध्ये फक्त ‘जय श्री राम, आम्ही पास होऊ देत’ आणि काही क्रिकेटपटूंची नावं लिहिली. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

‘नोटा’ला सर्वाधिक मतदान झाल्यास काय होणार? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

परीक्षेचे निकाल आल्यानंतर हे विद्यार्थी तब्बल ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली. दिव्यांशू सिंह नावाच्या एका विद्यार्थ्यानं परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे एकूण १८ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात व त्यांची पुनर्तपासणी करण्यासाठी आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल केला. या विद्यार्थ्याला अर्जाच्या उत्तरादाखल मिळालेल्या उत्तर पत्रिकांपैकी चार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये हा सगळा मजकूर असल्याचं दिसून आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राध्यापकांविरोधात पैसे खाल्ल्याचे आरोप

दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापक पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याची तक्रार याआधीही समोर आली होती. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनाही पत्र लिहून तक्रार केली होती. त्यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर यासंदर्भातला अहवाल सादर झाला असून संबंधित प्राध्यापक दोषी आढळून आले आहेत. विद्यापीठाकडून त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.