How a simple clue led to Pahalgam terror aide’s arrest : जम्मू आणि काश्मीकच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेण्यात आला. यादरम्यान एक सामान्य दिसणारे फोनचे चार्जर अत्यंत महत्त्वाचा पुरवा ठरले आहे. या चार्जरमुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांना २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका ‘ओव्हरग्राउंड वर्कर’ (OGW) चा माग काढण्यास मदत झाल्याची बाब समोर आली आहे.
मोहम्मद युसूफ कटारी (वय २६) याला सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. याने पहलगाममधील तीन दहशतवादी – सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना श्रीनगरजवळील झबरवान हिल्स येथे किमान चार वेळा भेटल्याचे समोर आले आहे.
तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण लॉजिस्टीक समोर्ट, ज्यामध्ये एक स्मार्टफोन चार्जर दिले होते आणि अखेरीस त्या चार्जरमुळेच त्याला अटक करण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
प्रकरणाचा उलगडा कसा झाला?
ऑपरेशन महादेव मध्ये सापडलेल्या पुराव्यांचे सखोल फॉरेन्सिक अॅनालिसीस केल्यानंतर या प्रकरणात मोठ खुलासा झाला. जुलै महिन्यात श्रीनगरच्या झब्रावन रेंजच्या जवळ ऑपरेशन महादेव ही दहशतवादविरोधी शोध मोहिम राबवण्यात आळी होती. या मोहिमेत पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या ऑपरेशनदरम्यान मिळालेल्या साहित्याची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी महत्वाची माहिती मिळाली होती
मिळालेल्या साहित्यामध्ये अर्धवट नष्ट झालेले अँड्रॉइड फोनचे चार्जर मिळाले होते. ते कोणीचे होते याचा माग काढण्यात आल्यानंतर पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.
श्रीनगर पोलिसांनी या चार्जरचा मूळ मालक कोण होता ते शोधून काढले, ज्याने पुष्टी केली की त्याने फोन एका डिलरला विकला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि काही काळात पोलिस कटारी पर्यंत पोहचले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की , कटारी हा केवळ एक पॅसिव्ह असोशिएट (passive associate) नव्हता, तर त्याचे काम त्याहूनही बरेच जास्त होते. त्याने या दहशतवाद्यांना डोंगराळ प्रदेशातून रस्ता दाखवण्याचे केले. तसेच, लपून बसलेले असताना त्यांना संपर्कात राहता यावे आणि आपले काम सुरू ठेवता यावे यासाठी लॉजिस्टिक पुरवठा केला, ज्यामध्ये या चार्जरचा देखील समावेश होता. कटारी हा डोंगराळ भागातील भटक्या समुदायातील मुलांना शिकवण्याचे काम करायाचा आणि दहशतवादी संघटनांसाठी तो महत्त्वाचा दुवा होता.
तपासात पुढे काय होणार?
सूत्रांच्या मते, हे प्रकरण लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NAI) सोपवले जाऊ शकते. एनआयए पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील व्यापक कटाची चौकशी करत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय आणि इतर मदत केल्याच्या आरोपाखाली एनआयएने आधीच इतर दोघांना अटक केली आहे.
२९ जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्या आलेल्या कारवाईत दहशतवादी सुलेमान उर्फ आसिफ , जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना ठार मारण्यात आले.