बोल्ला काली पूजेसाठी १० हजार बोकडांचा बळी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चीफ जस्टिस टीएस शिवगणनम आणि जस्टिस हिरमण्य भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारलं की पश्चिम बंगालमध्ये बकऱ्यांचा बळी देण्यावर काही प्रतिबंध आहे का? किंवा असे बळी जाऊ नयेत म्हणून काही कायदा आहे का? त्यावर हा तर्क देण्यात आला की तक्रार अशी नाही. मात्र पश्चिम बंगाल पशू वधन नियम १९५० अन्वये पशू वैद्यकीय चिकित्सकांनी बोकडाची तपासणी करुन ती बळी देण्यायोग्य आहे की नाही हे सांगावं.
वकिलांनी यावर सांगितलं या बोकडांचा बळी बोल्ला काली पूजेसाठी दिला जातो. सध्या न्यायालयाच्या आदेशांमुळे आणि केंद्र सरकारने मंजूर केलेल्या धोरणामुळे मागच्या दोन वर्षांपासून या पूजेच्या दिवशी बळी देण्याची प्रथा स्थगित करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हे देखील सांगितलं की दिनाजपूर या ठिकाणी बोल्ला काली मंदिर आहे. या मंदिराने आता घोषणा केली आहे की एकाचवेळी दहा हजार बोकडांचा बळी आम्ही देणार आहोत. राज्यभरात देवाची अशी काही मंदिरं आहेत जिथे बोकडांचा बळी दिला जाणार आहे.
खंडपीठाने हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण शुक्रवारी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. तसंच याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उद्या जे जे त्यांचं म्हणणं मांडणार आहेत त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करावं असंही सांगितलं. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. Live Law ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.