scorecardresearch

“भारतमातेच्या मुलांमध्ये फूट फाडण्यासाठी…”, BBC माहितीपटावरून वाद सुरु असताना पंतप्रधान मोदींचा इशारा

“एकता हाच अंतिम पर्याय…”

Pm Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावरून देशात बराच गदारोळ सुरु आहे. तर, केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घालती आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे.

दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, “देशात एकमेकांत मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,” असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

हेही वाचा : “१९६२ सालीच भारतीय जमिनीवर चीनची घुसखोरी, पण…”, एस जयशंकर यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

“भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पण, देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद होणार नाहीत. यासाठी एकता हाच अंतिम पर्याय आहे. एकता हीच भारताची ताकद आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

हेही वाचा : बीबीसीच्या माहितीपटाच्या प्रदर्शनावरून गोंधळ, ‘टीस’बाहेर भाजप युवा मार्चाचे आंदोलन

काय आहे प्रकरण?

‘बीबीसी’ने २००२ च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दंगलीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दोन भागांमध्ये माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रसारित केली. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात आला असून हा व्हिडीओ निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 11:11 IST