आगरतळा महानगरपालिका आणि त्रिपुरातील इतर नागरी संस्थांच्या २०० हून अधिक जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात भाजपाने भरघोस यश मिळवत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्रिपुरातल्या जनतेते स्पष्ट संदेश दिला आहे की ते सुशासनाचे राजकारण पसंत करतात. त्यांच्या या निःसंदिग्ध समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. मतदारांचे हे आशीर्वाद आम्हाला त्रिपुरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करण्याची अधिक शक्ती देतात.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालनंतर शेजारी राज्य त्रिपुरातही भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत आहेत. त्रिपुरात २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. आगरतळा मनपाच्या निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व वॉर्डमध्ये विजय मिळवला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि त्रिपुरात भाजपाने डाव्यांना सत्तेतून बाहेर केल्यानंतर या राज्यांमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्ये टक्कर आहे. त्रिपुरात २५ नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले. आज मतमोजणी झाली. भाजपा २०१८ ला राज्यात सत्तेत आली. त्यानंतर आता पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या आहेत. भाजपा, तृणमूल आणि भारतीय कम्यूनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) अशी तिरंगी लढत झाली आहे.