scorecardresearch

पंतप्रधान मोदींनी घेतला तिन्ही दलांच्या शस्त्र सज्जतेचा आढावा; युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिले ‘हे’ निर्देश

सुरक्षाविषयक मंत्री समितीच्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनाही हजेरी लावली होती.

PM Modi CCS Meeting
रविवारी पार पडली ही बैठक (फाइल फोटो)

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेचा आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सुरक्षाविषयक मंत्री समिती (सीसीएस)ची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताच्या शस्त्रसज्जतेचा आढावा घेण्याबरोबरच युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

मोदी काय म्हणाले?
बैठकीत मोदींनी संरक्षण यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असंही मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. आपण शस्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी झाल्यास केवळ संरक्षणदृष्ट्याच मजबूत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेतही भर पडेल, असे मोदींनी म्हटले. जगभरातील देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सध्या कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं याची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आल्याचं सुत्रांनी म्हटलंय. लष्कराबरोबरच हवाई आणि नौदलासंदर्भातील भारताच्या शस्त्र सज्जतेबद्दल पंतप्रधानांना सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.

मोदींनी दिले हे निर्देश…
“युक्रेनमधील घडामोडींबरोबरच ऑपरेशन गंगाअंतर्गत सुरु असणाऱ्या कामाचा तपशीलही मोदींना देण्यात आला. त्याचप्रमाणे ऑपरेशन गंगा अंतर्गत शेजारच्या देशांमधील नागरिकांनाही परत आणण्यात आल्याबद्दलची माहितीही पंतप्रधांना दिली गेली,” असं सुत्रांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे युक्रेनमधील खर्किव्ह शहरात मरण पावलेल्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करुन त्याचा पाठपुरावा करावा असे निर्देश मोदींनी दिलेत.

बैठकीला कोणीकोणी लावली हजेरी?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या मंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनाही या बैठकीला हजेरी लावली होती.

युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरता पोलंडमध्ये
युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाच्या आक्रमणामुळे युद्धग्रस्त युक्रेनमधील वेगाने ढासळणारी सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षात घेऊन युक्रेनमधील आपला दूतावास तात्पुरता पोलंडला हलवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हसह त्या देशातील महत्त्वाच्या शहरांनजीक पोहचत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. पुढील घडामोडी लक्षात घेऊन परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असे मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे. कीव्हमधील भारतीय दूतावासातील अनेक कर्मचारी याआधीच गेल्या काही दिवसांपासून ल्यिव्ह शहरातील त्यांच्या शिबिर कार्यालयातून (कॅम्प ऑफिस) काम करत आहेत. पश्चिम युक्रेनमधील ल्यिव्ह हे शहर पोलंडलगतच्या सीमेपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm modi chairs ccs meeting seeks integrating latest technology in security apparatus scsg

ताज्या बातम्या