PM Modi China Visit : भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्यावरून काहीसा तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. तब्बल ७ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे सध्या तिआंजिनमध्ये दाखल झाले असून ते शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी झाले आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्वाची बैठक झाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठकीत द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा पार पडली आहे. शी जिनपिंग आणि मोदी यांच्या या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. एससीओ शिखर परिषदेत मोदी सहभागी झाल्याबद्दल शी जिनपिंग यांनी मोदींचे आभार मानले आहेत. दरम्यान, परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशातील संबंध पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मोदींनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेवर आधारित संबंध पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, “चीनला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याबद्दल आणि आजच्या आमच्या बैठकीसाठी मी तुमचे आभार मानतो. सीमा व्यवस्थापनाबाबत आमच्या विशेष प्रतिनिधींमध्ये एक करार झाला आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे देखील पुन्हा सुरू होत आहेत”, असं मोदींनी म्हटलं.
#WATCH | Tianjin, China: During his bilateral meeting with Chinese President Xi Jinping, Prime Minister Narendra Modi says, "An agreement has been reached between our Special Representatives regarding border management. Kailash Mansarovar Yatra has been resumed. Direct flights… pic.twitter.com/ctxwPLlWXr
— ANI (@ANI) August 31, 2025
“दोन्ही देशांच्या २.८ अब्ज लोकांचे हित आमच्या सहकार्याशी जोडलेले आहे. यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही मोकळा होईल. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर आमचे संबंध पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गेल्या वर्षी कझानमध्ये आमच्यात खूप यशस्वी चर्चा झाली होती. ज्यामुळे आमच्या संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली. सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर शांतता आणि स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
#WATCH | Tianjin, China: During his bilateral meeting with PM Narendra Modi, Chinese President Xi Jinping says, "… China and India are two ancient civilisations in the East. We are the world's two most populous countries, and we are also important members of the Global South.… pic.twitter.com/uJV595g54i
— ANI (@ANI) August 31, 2025
शी जिनपिंग यांनी काय म्हटलं?
“चीन आणि भारत ही दोन प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. जग एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत. आपल्या दोन्ही देश कल्याण व जीवन सुधारण्याची तथा विकसनशील देशांची एकता आणि पुनरुज्जीवन वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची जबाबदारी आपण घेतो. चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणे, एकमेकांच्या यशाला सक्षम करणारे चांगले शेजारी असणे आणि ड्रॅगन व हत्ती एकत्र येणे हे खूप महत्वाचे आहे”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.