नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केले. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी परंपरेप्रमाणे मोदींनी सोमवारी संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचा दावा केला.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानविरोधात आपल्या लष्कराला १०० टक्के लक्ष्य साध्य करण्यात यश आले. या संघर्षामध्ये साऱ्या जगाने भारताचे लष्करी सामर्थ्य पाहिले. शत्रूच्या भूभागात खोलवर घुसून अवघ्या २२ मिनिटांमध्ये लष्कराने नेमके हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. देशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांच्या साह्याने भारताने लष्करी सामर्थ्य निर्माण केले आहे.
भारताच्या या नव्या लष्करी ताकदीमुळे जग प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले, असे मोदी म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये देशाच्या लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीचे संसदेच्या सभागृहांमध्ये एक सुरात अभिनंदन केले पाहिजे. राजकारणासाठी नव्हे, तर देशहितासाठी राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही मोदींनी या वेळी केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फडकावलेला तिरंगा ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले.