पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झालं. अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात उपचारांदरम्यान वयाच्या १०० व्या वर्षी हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी समाजमाध्यमांवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्व पक्षीय नेते आणि मान्यवरांनी मोदींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मोदींचे निकटवर्तीय असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिराबेन मोदींना श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही या दु:खद प्रसंगी मोदींसोबत असल्याचं अगदी सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. मोदींचे विश्वासू सहकारी असलेल्या अमित शाह यांनी आपल्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत. “पंतप्रधान मोदींच्या आई हीराबा यांच्या निधनाची बातमी फारच दु:खदायक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आई ही पहिली मित्र आणि गुरु असते. तिला गमावण्याचं दु:ख नक्कीच संसारामधील सर्वात मोठं दु:ख असतं,” असं म्हटलं आहे.

“हीराबा यांनी ज्या पद्धतीने आव्हानांना तोंड देत कुटुंबाचं पालन पोषण केलं ते आदर्श घेण्यासारखं आहे. त्यांचं त्यागपूर्ण आणि तपस्व्यासारखं जीवन नेहमीच आमच्या आठवणींमध्ये कायम राहणार आहे. संपूर्ण देश दु:खाच्या या प्रसंगी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. कोट्यावधी लोकांच्या प्रार्थना तुमच्याबरोबर आहेत,” असं अमित शाह म्हणाले.

नक्की वाचा >> मोदींना मातृशोक : अमित शाह, सुप्रिया सुळे, राज्यपाल कोश्यारी हळहळले; आदित्यनाथ म्हणाले, “आईच्या निधानामुळे मुलाला…”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरवरुन भावनिक संदेश पोस्ट करत हिराबेन मोदींना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच मोदींना धीर दिला आहे. “एका मुलासाठी आई म्हणजे संपूर्ण जग असतं. आईच्या निधानामुळे मुलाला सहन करता न येणारी आणि कायम अपूर्णत्वाची जाणीव करुन देणारी हानी होते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं निधन होणं ही फार वेदनादायक घटना आहे. प्रभु श्री राम दिवंगत पुण्यात्म्याला आपल्या चरणांशी स्थान देवो”, असं योगी यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा – PHOTOS : पंतप्रधान मोदींचा रुग्णवाहिकेतून प्रवास, गांधीनगरमधील घराबाहेरची गर्दी अन्…; हिराबेन मोदींना अखेरचा निरोप देतानाची क्षणचित्रे

यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi mother heeraben modi passed away amit shah yogi adityanath posted condolence tweets scsg
First published on: 30-12-2022 at 08:50 IST