PM Modi On Operation Sindoor at Bikaner : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बिकानेर येथे रेल्वे, रस्ते, वीज, पाणी आणि इतर अनेक विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पीएम मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, “मी येथे करणी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. करणी मातेच्या आशीर्वादाने विकसित भारत तयार करण्याचा आपला संकल्प अधिक मजबूत होत आहे. थोड्या वेळापूर्वी विकासाशी संबंधित २६ हजार कोटी रूपयांच्या योजनांचे येथे भूमीपूजन आणि लोकार्पण झाले आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना म्हणाले की, “तो गोळीबार पहलगाम येथे झाला होता, मात्र त्या गोळ्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या छातीवर जखमा केल्या होत्या. यानंतर प्रत्येक देशावासीयांनी एकत्र येत संकल्प केला होता की दहशतवादाला संपवून टाकू. त्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. आज तुमच्या आशीर्वादाने देशाच्या लष्कराच्या शौर्याने आपण ती प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. आमच्या सरकारने तीनही सेना दलांना पूर्णपणे मोकळीक दिली होती आणि तिन्ही सेना दलांनी मिळून असं चक्रव्यूह रचलं की पाकिस्तानला गुडगे टेकण्यास भाग पाडण्यात आले.”

पीएम मोदी म्हणाले की, २२ तारखेला केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी २२ मिनिटांत दहशतवाद्यांच्या ९ सर्वात मोठ्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. जगाने आणि देशाच्या इतर शत्रूंनी देखील पाहिले की जेव्हा सिंदूर दारूगोळा बनतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो.

पीएम मोदी बिकानेरमध्ये बोलताना म्हणाले की, “पाकिस्तानचा रहीमयार खान एअरबेस आयसीयूमध्ये पडला आहे, कधी उघडला जाईल माहिती नाही. पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार नाही चर्चा, बोलणी होतील त्या फक्त पाक व्याप्त काश्मीरबद्दल. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे सुरूच ठेवले तर त्यांना अन्नासाठी भीक मागावी लागेल, त्यांना भारताचे हक्कचे पाणी मिळणार नाही. जगातील कोणतीही शक्ती आम्हाला या संकल्पापासून रोखू शकत नाही.”

“प्रिय देशवासीयांनो हा बदला घेण्याचा खेळ नाही, हे न्यायाचे नवे स्वरूप आहे. हे ऑपरेशन सिंदूर आहे. हा फक्त आक्रोश नाही. हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे. हे भारताचे नवे स्वरूप आहे. याआधी घरात घुसून वार केला होता, आता थेट छातीवर प्रहार केला आहे. दहशतवादाची नांगी ठेचण्याची हीच रणनीती आहे, हीच पद्धत आहे, हा नवा भारत आहे,” असेही मोदी या भाषणा वेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी तीन सूत्र निश्चित केले आहे. पहिले- भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, त्याची वेळ आपले लष्कर निश्चित करेल आणि अटी देखील आपल्या असतील. दुसरे- अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत घाबरत नाही. तिसरे- आम्ही दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशवाद्यांचे म्होरके यांना वेगळं मानणार नाही. त्यांना एकच मानले जाईल. पाकिस्तानचा हा स्टेट आणि नॉन स्टेट अॅक्टरचा खेळा आता चालणार नाही. संपूर्ण जगभरात पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी सात प्रतिनिधी मंडळे संपूर्ण जगात पोहचत आहेत.”