PM modi Putin meet at SCO summit US Secretary Marco Rubio on relationship between US and India : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील तियानजिन येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेचे व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे बनल्याने या भेटींना विशेष महत्त्व आले आहे.

एकीकडे पंतप्रधान मोदी पुतिन आणि शी यांच्याशी गळाभेट घेत आहेत तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका प्रमुख व्यक्तीने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन डीसी यांच्यातील संबंध हे ‘२१व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण नातेसंबंध’ असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे नवीन उंची गाठत राहातील असे म्हटले आहे. “या महिन्यात आपण, आपल्याला पुढे घेऊन जात असलेले लोक, प्रगती आणि संधींवर लक्ष केंद्रित करत आहोत. नवे उपक्रम आणि उद्योजकता यापासून संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांपर्यंत आपल्या दोन्ही बाजूंच्या नागरिकांची टिकून राहिलेली मैत्री ही आपल्या या प्रवासाला ऊर्जा देते,” असे रुबियो म्हणाले आहेत. एससीओच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांच्या भेटीच्या अगदी काही मिनिटांपूर्वी अमेरिकेच्या दूतावासाकडून ही पोस्ट करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर युरेशियन शक्ती भारत, चीन आणि रशिया हे एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी केलेले विधान महत्त्वाचे आहे. रशियाकडून तेल खेरदी बंद करण्यास भारताने नकार दिल्यानंतर अमेरिकेने भारतीय आयातीवर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रिशियावर अनेक निर्बध लादले आहेत. असे असताना देखील भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनमधील तियानजिन येथे आयोजित एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि चीनचे पंतप्रधान शी यांनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी या जागतिक नेत्यांमध्ये काही काळ अनौपचारिक गप्पा देखील झाल्याचे पाहायला मिळाले.