नोटाबंदीचा निर्णय चुकल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. ‘पंतप्रधान मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. मोदींनी त्यांच्या चुकलेल्या निर्णयाची जबाबदारी स्विकारुन परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी,’ अशी घणाघाती टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याचा संदर्भ देत लालू प्रसाद यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले. ‘मोदींनी लाच का घेतली, याचे स्पष्टीकरण द्यावे. यासाठी पाटण्यामध्ये महारॅली आयोजित करुन मोदींचे दावे उघडे पाडण्यात येतील,’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.
‘पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाले आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना देशाच्या जनतेकडे ५० दिवस मागितले होते. मोदींनी मागितलेली मुदत संपत आली आहे. मात्र देशाची परिस्थिती सुधारलेली नाही. लोकांना अजूनही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मोदींच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आता मोदींनी या सगळ्यांच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,’ अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद पंतप्रधान मोदींवर बरसले.
‘सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करणे शक्य नाही. मात्र तरीही मोदी देशाला कॅशलेस करु पाहत आहेत. याचा फटका सामान्य माणसांना बसला आहे. शेतकरी, लहान व्यावसायिकांना या सगळ्याची झळ सोसावी लागली आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे संघटित लूट आहे, ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची टीका योग्यच आहे,’ असेदेखील लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे देशभरात चलन टंचाई निर्माण झाली. ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्ववत होईल, असे मोदींना सांगितले होते. मोदींच्या निर्णयाला ४४ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप देशातील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. ग्रामीण भागातील स्थिती अद्याप गंभीर आहे.