PM Modi speaks to Ukraine President Volodymyr Zelenskyy : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची सद्यस्थितीबद्दल चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी संध्याकाळी या चर्चेबद्दल माहिती दिली. तर या संवादादरम्यान काही काळापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वॉशिंग्टन येथे झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तियानजिन येथे चर्चा करणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या चर्चेच्या आधी मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर फोनवरून चर्चा झाली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनशी संबंधीत ताज्या घडामोडींवर त्यांचे मत मांडले,” असे पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेलन्स्की यांचे आभार मानले आणि भारताने संघर्षातून शांततापूर्ण तोडगा काढण्याची अढळ आणि सातत्यपूर्ण भूमिका याबरोबरच लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे भूमिका पुन्हा स्पष्ट केली, असेही या निवेदनात म्हटले आहे. “आजच्या फोन कॉलसाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार . आम्ही सुरू असलेला संघर्ष तसेच त्याची मानवतावादी बाजू आणि शांतता व स्थिरता पुन्हा स्थापण करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा केली. या दिशेने होणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो,” अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेनंतर एक्सवर केली आहे.

झेलेन्स्की यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा एक प्रॉडक्टीव्ह आणि महत्त्वाचा संवाद होता असे म्हटले आहे.

“मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. युरोपियन नेत्यांच्या सहभागासह वॉशिंग्टन येथे झालेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबत मी त्यांना माहिती दिली. हा एक प्रोडक्टीव्ह आणि महत्वाचा संवाद होता, खरी शांतता कशी मिळवावी याबाबत भागिदारांमध्ये एकसारखा दृष्टीकोन शेअर करण्यात आला. युक्रेनने रशियाच्या प्रमुखांबरोबर बैठकीसाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले,” असे झेलेन्स्की यांनी त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अलास्का येथे झालेल्या त्यांच्या बैठकीबद्दल माहिती दिली होती.

शांघाय सहकार्य संघटनेची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआनजिन येथे होणार असून, या संघटनेची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी बैठक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेदेखील या बैठकीला उपस्थित असतील.

या बैठकीवेळी पंतप्रधान मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. यावेळी युक्रेन युद्ध आणि अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ हे मुद्दे चर्चेचा भाग असण्याची शक्यता आहे.