Donald Trump on Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत “जगातल्या एकाही नेत्याने मला ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली नाही” असं म्हटल्यानंतर काही तासांतच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा स्पष्ट शब्दांत खोडला जात नसताना दुसरीकडे ट्रम्प मात्र सातत्याने हे दावे करताना दिसत आहेत.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी २९ वेळा भारत व पाकिस्तानच्या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. त्यावरून भारताच्या संसदेत खडाजंगी चालू असताना तिकडे ट्रम्प पुन्हा एकदा तोच दावा करताना दिसले. यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “भारत आमचा मित्र देश आहे. माझ्या विनंतीवरून भारतानं युद्ध थांबवलं. पाकिस्ताननंही तेच केलं. ते खूपच चांगलं झालं. मी अशा प्रकारच्या ५ वेगवेगळ्या युद्धांसंदर्भात अतिशय चांगलं काम केलं आहे. पण मला त्याचं श्रेय मिळणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
संसदेत नेमकं काय घडलं?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पहलगाम हल्ला व त्यानंतर राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी सरकारला धारेवर धरलं. राहुल गांधींनी तर थेट नरेंद्र मोदींना आव्हानच दिलं.
राहुल गांधींचं नरेंद्र मोदींना आव्हान
लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मंगळवारी आपल्या भाषणादरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. “जर पंतप्रधानांमध्ये इंदिरा गांधींच्या ५० टक्केदेखील हिंमत असेल, तर त्यांनी या सभागृहात आपल्या भाषणात हे सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत, ते खोटं बोलत आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता “जगातल्या कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी मला सांगितलं नाही”, अशा आशयाचं विधान केलं.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलं नाही, ९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला ते म्हणाले पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना उत्तर दिलं, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर तो त्यांना महागात पडेल”, असं मोदींनी लोकसभेतील भाषणात सांगितलं.