२ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी या माणसाचा नव्हे, तर एका युगाचा जन्म झाला होता. गांधीजींचे विचार स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात जितके कालसुसंगत होते तितकेच ते आजही आहेत. त्यांचे महत्त्व आणि त्यांची व्याप्ती जराही कमी झालेली नाही, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. येथे गांधीजी यांच्या एका पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
जगासमोर आज दोन मुख्य आव्हाने आहेत- एक दहशतवादाचे आणि दुसरे वातावरणीय बदलांचे. या समस्यांमुळेच एक अधीरता जगात दिसू लागली आहे आणि अगदी याच समस्यांबाबत महात्मा गांधी यांचे आयुष्य दीपस्तंभासारखे भासते, असे मोदी यांनी सांगताच उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. साधी राहणी, अहिंसा, साधनशुचिता ही गांधीजींची शिकवण आजही जगाला विनाशाच्या खाईत जाण्यापासून रोखू शकते, असे मोदी यांनी सांगितले.
रोमा स्ट्रीट पार्कलँड येथे गांधीजींच्या अडीच मीटर उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर मोदी यांनी येथील भारतीय नागरिकांशी मुक्त संवाद साधला. राजीव गांधी यांच्यानंतर तब्बल २८ वर्षांनी ऑस्ट्रेलियात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान.
मोदी – मर्केल भेटीत ‘जर्मन’चा मुद्दा
केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन भाषेऐवजी संस्कृत भाषेचा पर्याय सुरू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाबाबत असलेली नापसंती जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत व्यक्त केली. यावेळी भारतीय पद्धतीच्या परिप्रेक्षात या निर्णयाचा विचार होईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.
भारताच्या कराराचे कौतुक
जागतिक व्यापार परिषदेतील ‘व्यापार सुलभीकरण करारात’ धोंड ठरणाऱ्या तरतुदींवर तोडगा काढणारी सूत्रे भारत आणि अमेरिकेने तयार केली आहेत, या प्रयत्नाचे ‘जी२०’ परिषदेत कौतुक करण्यात आले. या प्रयत्नांमुळे बहुआयामी व्यापार प्रक्रियेस वेग येईल, असा विश्वास सर्व राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारदर्शकतेचा पुरस्कार आणि आशादायी वाटचाल
ब्रिस्बेन : ‘जी २०’ राष्ट्रांच्या परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी काळ्या पैशांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेस अन्य देशांचा पाठिंबा मिळाला. करविषयक माहितीच्या देवाणघेवाणीसाठी नवी प्रणाली अस्तित्त्वात यावी आणि त्याला आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोड मिळावी यावर शिक्कामोर्तब झाले. हेच या परिषदेचे फलित म्हणता येईल. परिषदेतील अन्य महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे :
लवकरच करविषयक माहितीचे आदानप्रदान
एका देशात कर चुकवणाऱ्यांना अन्य देशांमधील बँकांमध्ये पैसे गुंतवून निर्धास्त राहण्याची सुविधा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरते हे लक्षात घेत यापुढे करविषयक माहितीच्या आदानप्रदानाची प्रक्रिया सुलभ करण्याचा तसेच ही व्यवस्था सन २०१७ पर्यंत कार्यान्वित करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. नव्या प्रणालीद्वारे सर्वच देशांना करप्रणालीच्या माहितीबाबत समान मानके लागू होतील.
विशेष वर्ष
२०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी जी२० भ्रष्टाचारविरोधी कृती कार्यक्रम यावेळी जारी करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार्य, कायदेशीर मदत, एका देशातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना अन्यत्र मोकळीक मिळणार नाही हे पाहणे, वाढीस पोषक वातावरण तयार करणे ही याची वैशिष्टय़े.
‘जागतिक जीडीपी’त वाढ
विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या जगातील २० प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांनी येत्या पाच वर्षांत जागतिक सकल उत्पन्नात दोन हजार अब्ज डॉलरनी वाढ करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
*व्यापारउदिमात आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढीव गुंतवणूक करण्यास प्राधान्य
*जीवनमानाचा चांगला दर्जा, रोजगाराच्या उत्तम संधी निर्माण करण्यास २० देशांचे प्राधान्य
* खासगी क्षेत्रात चैतन्य आणणारे निर्णय आवश्यक
*सन २०१८ पर्यंत अर्थव्यवस्थेत २.१ टक्क्यांच्या वाढीचे उद्दिष्ट
*गुंतवणुकीस चालना, रोजगार निर्मिती आणि स्पर्धात्मकता वाढविण्यावर भर
*पुरुष व महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येतील फरक २०२५ पर्यंत २५ टक्क्यांनी कमी करणार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi unveils mahatma gandhis statue in brisbane
First published on: 17-11-2014 at 01:14 IST