पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करून स्वतःचे उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना गटशेती करण्याचा सल्ला दिला. यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी एकत्र करून नगदी पिके घेण्याचे सुचवले.

नवी दिल्लीमधील ‘भारतीय कृषी संशोधन संस्था’ (आयएआरआय) येथे शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी कृषी क्षेत्रासाठी दोन योजना सुरू केल्या. त्यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांशी संभाषण केले. यावेळी मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पन्नवृद्धीसाठी वेगवेगळे उपाय सुचवले. त्यांनी शेतकऱ्यांना हळूहळू आणि व्यावहारिकदृष्ट्या नैसर्गिक शेतीचा स्वीकार करायला सांगितले. पारंपारिक पद्धती कायम ठेवत जमिनीच्या एका तुकड्यावर नैसर्गिक शेती करावी, जेणेकरून हळूहळू विश्वास निर्माण होईल, असे पंतप्रधानांनी सुचवले, अशी माहिती सरकारतर्फे प्रसृत निवेदनात देण्यात आली. यावेळी देशाच्या विविध भागांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना आपापले अनुभव सांगितले.