पीटीआय, सहारणपूर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी मुस्लीम लीगच्या विचाराप्रमाणेच आहे अशी तिखट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. त्यावर पंतप्रधान मोदींना इतिहासाचे ज्ञान नाही, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच मुस्लीम लीगबरोबर सरकार स्थापन केले होते असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या सुमाराला असलेली काँग्रेस काही दशकांपूर्वीच संपली आहे. ‘‘काँग्रेसबरोबर अनेक थोर लोक जोडलेले होते. महात्मा गांधींचे नाव काँग्रेसशी जोडलेले होते. आज उरलेल्या काँग्रेसकडे ना देशाच्या हिताची धोरणे आहेत ना देशाच्या विकासासाठी दृष्टी’’, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची…”

पुढे मोदी म्हणाले की, ‘‘काल ज्या प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यामुळे हे सिद्ध झाले की आजची काँग्रेस ही देशाच्या आशा आणि आकांक्षांपासून पूर्णपणे तुटलेली आहे’’. काँग्रेस दूरदूरही नजरेला पडत नसल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी ही अस्थैर्य आणि अनिश्चितता यांचे दुसरे नाव झाले आहे, त्यामुळे त्यांनी उच्चारलेली एकही गोष्ट हा देश गांभीर्याने घेत नाही असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांना इतिहासाचे ज्ञान नाही असे म्हणत त्यांच्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले, तसेच पंतप्रधान विभाजनवादाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ‘‘पंतप्रधानांना त्यांचा इतिहास माहत नाही. अन्य कोणी नाही तर, तेव्हा जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच बंगालमध्ये मुस्लीम लीगबरोबर संयुक्त सरकार स्थापन केले होते’’. हिंदू महासभा आणि मुस्लीम लीगने स्वातंत्र्यापूर्वी बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांतामध्ये संयुक्तरित्या सरकार स्थापन केले होते. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच भाजपचा पूर्वीचा पक्ष असलेल्या जनसंघाची स्थापना केली होती.