लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ५ एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासनासह तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. “काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला. ते उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या रॅलीला संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“पहिली काँग्रेस आता राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे दिसून येते. तसेच जाहीरनाम्याचा काही भागावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसतो आहे. काँग्रेस ज्या उमेदवाराला तिकीट देते तो उमेदवार दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडत आहे. आज उरलेल्या काँग्रेसकडे राष्ट्रहिताची काहीच धोरणे नाहीत. देशाच्या विकासासाठी काही धोरणदेखील नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“महात्मा गांधी यांच्यासह अनेक महान व्यक्ती काँग्रेसबरोबर जोडले गेले होते. मात्र, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी अस्तित्वात असलेली काँग्रेस दशकापूर्वीच संपली आहे. आता जी काँग्रेस राहिली, त्यांच्याकडे देशाच्या हितासाठी काहीही नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषितांचा विचार केला नाही”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

हेही वाचा : जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

काँग्रेस उमेदवार देण्याचे धाडस करत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशमच्या सहारनपूर येथे भव्य रॅली पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसने बालेकिल्ला म्हणून मानलेल्या अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातदेखील काँग्रेस उमेदवार उभे करण्याचे धाडस दाखवू शकत नाही”, असा टोला पंतप्रधान मोदी काँग्रेसला लगावला.

काँग्रेसने जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या?

काँग्रेसने जाहीरनाम्यात तीस लाख युवकांना सरकारी नोकरी, आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे आश्वासन, गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्याचे आश्वासन, अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासन तसेच गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याच्या आश्वासनासह आदी मोठ्या घोषणा काँग्रेसने केल्या आहेत.