नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होऊ शकते, तसे झाल्यास या चर्चेला गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. द इंडियन एक्स्प्रेसला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधी अमेरिकेने भारताला सूचित केले आहे.
द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू कराव्यात, असे निर्देश मोदी आणि ट्रम्प यांनी आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्यानंतर वाटाघाटीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, व्यापार कराराला अंतिम स्वरूप मिळू शकलेले नाही. अमेरिकेचे भारतातील नियोजित राजदूत सर्गेई गोर हे ट्रम्प यांचे विश्वासू मानले जातात. ते या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी आशा अधिकाऱ्यांना वाटत आहे.
हा करार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, अमेरिकेने लादलेले प्रचंड आयातशुल्क आणि कृषी व दुग्धजन्य उत्पादनांच्या समावेशाबद्दलचे मतभेद यामुळे हा करार अद्याप अपेक्षित गतीने पुढे गेलेला नाही. सध्या दोन्ही देशांदरम्यान १९१ अब्ज डॉलर इतका व्यापार होतो, तो २०३०पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.