PM Narendra Modi to Pakistani Youth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (२६ मे) गुजरातमधील दाहोद येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला. सीमेवरील पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती व दहशतवादी कारवायांवरून मोदी यांनी संताप व्यक्त केला. तसेच, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून मोदी यांनी संताप व्यक्त केला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, दोन्ही देशांनी सामंजस्याने युद्धविरामाचा निर्णय घेतला. तरीदेखील पाकिस्तानी लष्कर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. यावरून मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानी सरकारला व त्यांच्या लष्कराला मोदींनी स्पष्ट संदेश दिला की “शांततेत जीवन जगा, तुमची भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच”.
पंतप्रधान मोदी यांनी कच्छ येथील जनसभेला संबोधित करताना पाकिस्तानी तरुणांना देखील एक सल्ला दिला आहे. मोदी म्हणाले, “पाकिस्तानला दहशतवादाच्या रोगापासून मुक्त करण्यासाठी तिथल्या जनतेने पुढे आलं पाहिजे. तिथल्या तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. तुम्ही सुखाने, आनंदाने जगा, स्वतःची भाकर खा, नाहीतर माझी गोळी खा”.
…म्हणून पाकिस्तान शरणागतीसाठी हतबल झाला : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तानच्या हल्ल्याचा आपल्या लष्कराने इतक्या ताकदीने समचार घेतला की त्यांचे सगळे एअरबेस (लढाऊ विमानतळ) आयसीयूमध्ये पडले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान शरणागतीसाठी हतबल झाला. कारण, त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही. आता आपण वाचणार नाही. भारताने आता रौद्र रूप दाखवलं आहे. भारतीय लष्कराच्या साहस आणि पराक्रमासमोर त्यांना झुकावं लागलं. ही (ऑपरेशन सिंदूर) आपल्या लष्कराची एक तंत्रशुद्ध व यशस्वी मोहीम होती”.
देशाचे प्रमुख म्हणाले, आपल्या लष्कराने ऑपरेशन मोहीम हाती घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने पांढरा ध्वज फडकावण्यास सुरुवात केली होती. ते म्हणाले, “आम्हाला बंदुका चालवायच्या नाहीत”. त्यावर आम्ही म्हणालो, आम्ही आधीच सांगितलेलं, आम्हाला दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायचा होता, त्यांना मारायचं होतं. दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता, आम्ही तेच करत होतो. तुम्हीच मध्ये आलात. त्यानंतर पाकिस्तानने शांत बसायला हवं होतं. पण ते काही ऐकले नाहीत. आता त्यांनी चूक केली आहे, त्यामुळे शिक्षा तर भोगावीच लागेल.