पीटीआय, तियान्जिन
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. ‘‘युक्रेनबरोबरील संघर्ष लवकरात लवकर संपविणे मानवतेच्या दृष्टीने करण्यात आलेले आवाहन आहे,’’ या शब्दांत मोदी यांनी पुतिन यांना युद्ध संपविण्याचे आवाहन केले.
दोन्ही नेत्यांच्या भेटीला भारत-अमेरिकेमधील बिघडलेल्या संबंधांचीही याला पार्श्वभूमी होती. मोदी-पुतिन यांनी आर्थिक, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढत असल्याबद्दल उभयतांनी समाधान व्यक्त केले.
मोदी म्हणाले, ‘‘कठीण प्रसंगांत भारत-रशिया एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कायमच उभे असतात. जागतिक शांतता, स्थिरता आणि प्रगतीसाठी भारत-रशिया संबंध महत्त्वाचे आहेत. रशियाच्या अध्यक्षांचे भारतामध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’ पुतिन हे येत्या डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये युक्रेनमधील समस्येचाही समावेश होता. युक्रेन समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच, हा संघर्ष लवकरात लवकर संपविण्याची गरज व्यक्त केली.
‘युक्रेन संघर्षासाठी पाश्चिमात्य देश जबाबदार’
‘युक्रेनला सातत्याने ‘नेटो’ देशांचा सदस्य करून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी प्रयत्न करणे, हे युक्रेनबरोबरील संघर्षाचे मुख्य कारण आहे,’ असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी केले. शिखर परिषदेला संबोधित करताना युद्धासाठी त्यांनी पाश्चिमात्य देशांना जबाबदार ठरवेल.
युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांचे स्वागत आहे. संबंधित पक्ष सकारात्मकतेने पुढे जातील, अशी आशा आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपावा आणि या भागात कायमस्वरुपी शांतता नांदावी, हे मानवतेकडून केले जाणारे आवाहन आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पाश्चिमात्यांनी चिथावणी दिल्यामुळे युक्रेनमध्ये २०१४मध्ये बंड झाले, या युद्धाचे हेच मुख्य कारण आहे. ‘नेटो’ सदस्य देशांमध्ये युक्रेनला स्थान दिले, तर थेट रशियाच्या सुरक्षेला धोका आहे. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया