पीटीआय, माले
‘‘भारताचे येत्या काळात मालदीवबरोबरील संबंध आणखी दृढ होतील, अशी आशा बाळगतो,’’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काढले. मालदीवचे उपाध्यक्ष हुसैन लतीफ यांच्यासह विविध नेत्यांची त्यांनी भेट घेतली. मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी या वेळी शुभेच्छा दिल्या.
लतीफ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत भारत-मालदीव संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात पायाभूत क्षेत्रांतील, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा झाली. त्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद, मालदीवच्या संसद सभागृहाचे अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल्ला यांचीही मोदींनी भेट घेतली.
‘‘दोन्ही देशांनी आपापसांतील विशेष संबंधांवर चर्चा केली. गरजेच्या वेळी मालदीवला कायम सहकार्य करीत राहिल्याच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष लतीफ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले,’’ अशी टिप्पणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमावर केली.
मालदीवचे माजी अध्यक्ष महंमद नशीद यांची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले, ‘‘नशीद हे भारत-मालदीव मैत्री संबंधाचे कायम पुरस्कर्ते राहिलेले आहेत. मालदीव हा भारताच्या शेजारी देशांच्या धोरणामध्ये कसा महत्त्वाचा आहे, हे त्यांच्याशी बोललो.’’
‘हिंदी महासागर साक्षी’
माले: ‘‘भारत-मालदीवमधील दीर्घ काळापासूनच्या संबंधांना हिंदी महासागर साक्षी आहे,’’ असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांनी शनिवारी केले. दोन्ही देशांतील संबंध राजनैतिक संबंधांपलीकडे आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींसाठी शुक्रवारी रात्री खास भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे उद्गार काढले.
पायाभूत सुविधा, हवामान बदल, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांत दोन्ही देश बरोबर काम करतील. त्याचा आमच्या जनतेला मोठा फायदा होईल. आम्ही हे संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा बाळगतो. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दोन्ही देशांतील ६० वर्षांचे राजनैतिक संबंध हे इतिहास आणि कायमस्वरूपी मैत्रीचे प्रतीक आहेत. यामागे शेकडो वर्षांचा परस्परसंपर्क आहे. या संबंधांचा हिंदी महासागर साक्षी आहे. शेकडो वर्षांच्या या परंपरेने कधीही न तुटणारा बंध तयार झाला आहे. – मोहम्मद मुइझ्झू, अध्यक्ष, मालदीव