लंडन : क्रिकेट या खेळाचा जन्म ब्रिटनमधला तर भारतात हा सर्वात लोकप्रिय खेळ. दोन्ही देशांमध्ये गुरुवारी झालेल्या मुक्त व्यापार करारावर क्रिकेटची छाप दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष कीर स्टार्मर यांनी मुक्त करारावर चर्चा करताना क्रिकेटच्या रूपकांचा वापर केला. ‘क्रिकेट हे आमच्या भागीदारीचे एक उत्तम प्रतीक आहे,’ असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळत असतानाच दोन्ही देशांमध्ये झालेल्या व्यापार करारावरही क्रिकेटचा ठसा उमटला. मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी क्रिकेटच्या रूपकांचा सफाईदार वापर केला. ‘‘कधी कधी स्विंग आणि मिस होऊ शकतो, परंतु आम्ही नेहमीच सरळ बॅटने खेळतो,’’ असे पंतप्रधान म्हणाले. उच्च-स्कोअरिंग करण्यास आणि ठोस भागीदारी निर्माण करण्यास वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. आज स्वाक्षरी केलेले करार आणि व्हिजन २०३५ हे या भावनेला पुढे नेणारे टप्पे आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
‘‘भारत आणि ब्रिटन दोघांसाठीही क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही तर ते एक वेड आहे आणि आमच्या भागीदारीचे एक उत्तम प्रतीकही आहे’’, असे पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी स्टार्मर यांच्यासह लंडनमधील ‘बकिंगहॅम स्ट्रीट क्रिकेट हब’च्या खेळाडूंशीही संवाद साधला.
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारात काय?
● ब्रिटनमध्ये फळे, भाज्या, धान्ये, हळद, वेलची आणि आंब्याचा गर, लोणचे व डाळींसारख्या प्रक्रिया केलेल्या वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश.
● आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ आणि तमिळनाडूमधील मत्स्य व्यवसायाला चालना. ब्रिटनच्या बाजारात ५.४ अब्जर डॉलरची सागरी आयात प्रवेश मिळवून विस्तारित होईल.
● महाराष्ट्र (द्राक्षे, कांदे), गुजरात (भुईमूग, कापूस), पंजाब व हरियाणा (बासमती तांदूळ), केरळ (मसाले) आणि ईशान्येकडील राज्ये (फलोत्पादन) यांसारख्या राज्यांना या कराराचा फायदा होईल.
कामगारकेंद्रित क्षेत्रांना शुल्कमुक्त प्रवेश -गोयल
नवी दिल्ली : भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे ब्रिटिश बाजारपेठेत चर्मोद्याोग, विद्याुत यंत्रे आणि रसायने यांसारख्या अनेक देशांतर्गत क्षेत्रांना शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. त्यामुळे जवळजवळ २३ अब्ज डॉलरच्या संधी उपलब्ध होतील, असे वाणिज्य आणि उद्याोगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
भारतीय निर्यातीपैकी सुमारे ९९ टक्के निर्यातीसाठी शुल्कमुक्त प्रवेशामुळे कामगारकेंद्रित क्षेत्रांसाठी सुमारे २३ अब्ज डॉलरच्या संधी उघडल्या जातात, ज्यामुळे समावेशक आणि लिंग-समानता वाढीसाठी एक नवीन युग सुरू होईल, असे गोयल यांनी ‘एक्स’वर सांगितले. कारागीर, विणकर आणि कापड, चर्म, पादत्राणे, रत्ने व दागिने, खेळणी आणि सागरी उत्पादनांच्या सूक्ष्म- लघू-मध्यम उद्योगांत रोजंदारीवर काम करणारे कामगार समृद्धीच्या नवीन टप्प्यात प्रवेश करतील, असे ते म्हणाले. या करारामुळे जवळपास ९५ टक्के कृषी उत्पादनांची करमुक्त निर्यात सुनिश्चित होईल.