PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी संसदेत जखमी झालेल्या दोन खासदारांची विचारपूस केली आहे. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केली आणि मला पाडलं असा आरोप त्यांनी केला आहे. तर राहुल गांधींनी आरोप फेटाळले आहेत.

सारंगी यांचा आरोप काय?

मी पायऱ्यांवर उभा होतो, त्यावेळी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी एकाला धक्का दिला. ते माझ्या अंगावर पडले आणि मी राहुल गांधींमुळे जखमी झालो असं सारंगी यांनी म्हटलं आहे. सारंगी यांना आता रुग्णालयात नेण्यात आलं आहे तसंच या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( PM Narendra Modi ) देण्यात आली आहे. राहुल गांधींनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी दोन्ही खासदारांची विचारपूस केली.

राहुल गांधी काय म्हणाले?

“आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मल्लिकार्जुन खरगेंनाही धक्काबुक्की झाली-राहुल गांधी

यानंतर राहुल गांधी म्हणाले मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. राहुल गांधी म्हणाले की आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”

नेमकी घटना काय घडली?

केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचं राहुल गांधी आणि सारंगी या दोघांनीही सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धक्काबुक्की झाल्यानंतर काय घडलं?

भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी खाली पडल्यानंतर राहुल गांधी त्यांना काय झालं आहे ते बघायला गेले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार चांगलेच आक्रमक झाले. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “राहुल, तुम्हाला लाज वाटत नाही का? गुंडगिरी करता? एका वृद्ध खासदाराला ढकललं.” त्यावर राहुल गांधी म्हणाले की “मी त्यांना ढकललं नाही त्यांनीच मला ढकललं.” जखमी खासदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( PM Narendra Modi ) फोन करुन या दोन्ही खासदारांची चौकशी केली.