पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती.

गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही.  

मंत्रालयाने सांगितले की, या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi cancels his scheduled visit to punjab ferozepur to address a rally hrc
First published on: 05-01-2022 at 15:13 IST