देशात करोनाचं थैमान सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI यांच्यात आर्थिक स्थितसंदर्भात विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल व विरल आचार्य यांनी याचमुळे मुदतपूर्व राजीनामे दिल्याचंही बोललं गेलं. हे सर्व दावे मोदी सरकारनं फेटाळून लावले आहेत. मात्र, आता अर्थखात्याचे माजी सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत खळबळजनक दावा केला आहे. मोदींनी आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना थेट पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या सापाशी केल्याचं ते म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सुभाष चंद्र गर्ग यांनी हा दावा त्यांच्या 'वी अल्सो मेक पॉलिसी' या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात सुभाष चंद्र गर्ग यांनी 'गव्हर्नर उर्जित पटेल रिजाईन्स' या प्रकरणात हा उल्लेख केला आहे. २०१८ ची 'ती' बैठक! सुभाष चंद्र गर्ग यांनी पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, देशातील आर्थिक स्थिती आणि केंद्र व आरबीआयमधील विसंवाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १४ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकार व आरबीआयच्या उच्चपदस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आर्थिक स्थितीबाबत सविस्तर प्रेझेंटेशन केलं. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली व मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हेही त्यावेळी उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर पंतप्रधानांना आर्थिक स्थितीवर कोणताही उपाय समोर येताना दिसत नव्हता. महिला आरक्षण २०३४ च्या आधी मिळू शकणार नाही; माजी केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा दावा "उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही शिफारसी केल्या. काही सल्ले दिले. यामध्ये केंद्र सरकारनं कोणती पावलं उचलायला हवीत, त्याचा उल्लेख होता. यात आरबीआयकडून तेव्हा केल्या जाणाऱ्या उपाययोजनांशिवाय कोणत्याही नव्या कृतीचा समावेश नव्हता. पण पंतप्रधानांचं म्हणणं होतं की आरबीआय त्या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी काहीही करत नसून केंद्र व आरबीआयमधील संबंध सुधारण्यावरही काम होत नाहीये", असं सुभाष चंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. "उर्जित पटेल पैशांच्या ढिगाऱ्यावरचे साप" पंतप्रधानांनी उर्जित पटेल यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या सापाशी केल्याचा दावा सुभाष चंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. "उर्जित पटेल यांच्या सूचनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले. मी त्यांना इतक्या रागात कधीच बघितलं नव्हतं. त्यांनी उर्जित पटेल यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या सापाशी केली. आरबीआयचा निधी या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वापरत नसल्याबद्दल त्यांनी गव्हर्नरना जबाबदार धरलं", असं सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे. “नरेंद्र मोदी सरकारला तेव्हा RBI कडून २ ते ३ लाख कोटी हवे होते”, माजी गव्हर्नर विरल आचार्यांचा खळबळजनक दावा! "यावेळी पंतप्रधानांनी संतापातच उर्जित पटेल यांना आरबीआयच्या काही मुद्द्यांवर सुनावलं. तसेच, त्यांना आरबीआयच्या बोर्डाची बैठक घेऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थतज्ज्ञांच्या गटाची मदत घेण्यासही पंतप्रधानांनी उर्जित पटेल यांना सांगितलं", असा दावा सुभाष चंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.