PM Modi on Donald Trump Statements: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी गेल्या काही महिन्यांपासून भारताविरोधात टिप्पणी करत होते. या टीकेच्या मालिकेला शुक्रवारी विराम मिळाला. चीनमध्ये पंतप्रधान मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे सूर बदलले. शुक्रवारी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींशी माझी मैत्री कायम राहिल, ते एक चांगले पंतप्रधान आहेत. यावर आता पंतप्रधान मोदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी म्हणाले होते की, माझी आणि मोदींची मैत्री कायम राहिल. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. भारत आणि अमेरिकेचे विशेष नाते आहे. यात काळजी करण्यासारखे काही नाही. ते काही महिन्यांपूर्वी इथे आले होते. तेव्हा आम्ही एकत्र रोज गार्डनमध्ये गेलो होतो.

भारताला तुम्ही गमवले आहे का? असा प्रश्न राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका संबंधाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सकारात्मकता दाखवली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभार. आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि भविष्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन यामध्ये भारत आणि अमेरिका खूप सकारात्मक आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रुथ या सोशल मीडियावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले होते की, “असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनमुळे गमावले आहे. त्यांचे भविष्य दीर्घ आणि समृद्ध असो!”