आजपासून एअरो इंडिया २०२३ या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला सुरूवात झाली आहे. हा एअर शो १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूच्या येलाहंका येथे होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एअर शोचं उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना, हा केवळ एअर शो नसून त्यातून भारताचे सामर्थ्य दिसून येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
भारत आज लढाऊ विमानाच्या वेगाने प्रगती करतो आहे. भारताने गेल्या आठ ते नऊ वर्षांत संरक्षण क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. ही फक्त सुरुवात आहे. २०२४-२५ पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात ५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे आमचं ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. तसेच हा केवळ एअर शो नसून भारताची ताकद आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर यंदाच्या एअरशोमध्ये १०० पेक्षा अधिक देशांनी सहभाग घेतला आहे. यातून जगाचा नव्या भारतावर विश्वास आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – अदाणी समूह प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्ला; लोकसभा सचिवालयाची राहुल गांधींना नोटीस
१३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणार ‘एअर शो’
दरम्यान, आजपासून एअरो इंडिया २०२३ या एअर शोला सुरुवात झाली असून यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत. हा एअर शो १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर पार पडेल. तसेच हवाई दलात नव्याने सहभागी झालेलेल्य ‘तेजस’ हे लढाऊ विमान या एअर शोचे मुख्य आकर्षण असणार आहे.