झारसुगुडा (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथे भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ४जी नेटवर्कचे लोकार्पण केले. यामुळे भारताचा जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र म्हणून उदय होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

‘बीएसएनल’च्या ‘स्वदेशी ४जी’मुळे दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ‘बीएसएनल’च्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून ४जी सेवेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ९७ हजार ५०० मोबाईल ४जी टॉवर सुरू करण्यात आले. त्यामध्ये ‘बीएसएनल’च्या ९२,६०० टॉवरचा समावेश आहे. हे टॉवर संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने उभारण्यात आले असून त्यासाठी सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. ‘स्वदेशी ४जी’ सुरू झाल्यामुळे स्वदेशी दूरसंचार उत्पादने वापरणाऱ्या डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशांच्या रांगेत भारताने स्थान मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, “४जी तंत्रज्ञानामुळे देशभरात दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना थेट फायदा होईल. पूर्वी जलदगती इंटरनेट न मिळणारी जवळपास ३० हजार गावे आता या उपक्रमाने जोडली जातील.” आदिवासी प्रदेश, दुर्गम गावे आणि डोंगराळ भागांना या सेवेचा सर्वाधिक फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील मुले ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहू शकतील, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना पिकांचे दार पाहता येतील आणि रुग्णांना टेलिमेडिसिनद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेणे सोपे जाईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान,

काँग्रेसवर टीका

यावेळी आयोजित ‘नमो युवा समाबेश’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने जनतेला लुटायची एकही संधी सोडली नाही, भाजपने ही लूट थांबवून देशाला वाचवले अशी टीका त्यांनी केली. भाजप सरकारने आपली धोरणे आणि जीएसटी दरामध्ये सुसूत्रीकरण करून जनतेची दुहेरी बचत आणि दुहेरी कमाई होण्याची खबरदारी घेतली असा दावाही मोदींनी केला. पूर्वी दोन लाख इतक्या कमी उत्पन्नावरही नागरिकांना कर द्यावा लागत होता, आम्ही ही मर्यादा आता १२ लाख रुपयांवर आणली आहे, असे ते म्हणाले.

५०,००० कोटींच्या प्रकल्पांची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी ओडिशात ५० हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यामध्ये दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, विकास कौशल्य आणि ग्रामीण गृहबांधणी क्षेत्रांसाठी विविध योजनांचा समावेश आहे. आठ आयआयटी प्रकल्पांच्या विस्तारासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या योजनेमुळे तिरुपती, पलक्कड, भिलाई, जम्मू, धारवाड, जोधपूर, पाटणा आणि इंदूर आयआयटींमध्ये पुढील चार वर्षांमध्ये १२ हजार जागा वाढणार आहेत.