तिरुअंनतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळमधील विळींजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. येत्या काही वर्षांत या बंदराची क्षमता तिप्पट होणार असून जगातील मोठी मालवाहू जहाजे येथे सहजपणे येऊ शकतील तसेच या बंदरामुळे केरळात आर्थिक स्थैर्य लाभेल, असे ते म्हणाले.
बंदर प्रकल्पामुळे भारताचे किनारपट्टीवरील राज्य आणि शहरे विकसित भारताच्या विकासासाठी एक प्रमुख केंद्र बनतील, असे पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्याची सुलभता एकाच ठिकाणी प्रोत्साहित केली जाते तेव्हा अर्थव्यवस्था भरभराटीला येते, असे ते म्हणाले. देशातील मुख्य पायाभूत सुविधा वाढविल्यानंतर आता जागतिक व्यापारातील भारताची रणनीतिक स्थिती बळकट करण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केले असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.
हा प्रकल्प ८,६८६ कोटी रुपयांचा असून केरळ सरकारची ५३७०.८६ कोटींची भागीदारी आहे. तर अदानी समुहाने २४९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून केंद्राने ८१८ कोटींचा निधी दिला आहे.
अदानी समुहाने विकसित केलेल्या विळींजम बंदराचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, गुजरातमधील लोक अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर निराश होऊ शकतात, ज्यांनी स्वत: गुजरातचे असूनही केरळमध्ये इतके मोठे बंदर बांधले आहे.
‘अनेकांची झोप लवकरच उडणार’
उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीचे स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘शशी थरूरदेखील येथे बसले आहेत आणि मी असे म्हणू इच्छितो की आजचा कार्यक्रम अनेक लोकांची झोप उडवेल’ असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या १० वर्षांत भारताने आपल्या बंदरांची क्षमता दुप्पट केली आहे आणि राष्ट्रीय जलमार्ग आठपट वाढवले आहेत. आज जगातील पहिल्या ३० बंदरांमध्ये दोन भारतीय बंदरांचा समावेश आहे. जागतिक जहाजबांधणीतही देशाने आता पहिल्या २० बंदरांमध्ये स्थान मिळविले आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हा प्रसंग केवळ बंदर उद्घाटनाचा नसून तिसऱ्या सहस्राब्दीच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे.हे बंदर केरळसाठी स्वप्नवत आहे.या बंदरामुळे जागतिक सागरी व्यापार, मालवाहतूकीसाठी दुवा ठरणार आहे.– पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ