नवी दिल्ली : दिल्ली, महाराष्ट्र, केरळसह अनेक राज्यांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने राज्यां-राज्यांमध्ये टाळेबंदीसदृश्य निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, ‘‘अर्थचक्र थांबणार नाही, याची काळजी घेऊन स्थानिक पातळीवर निर्बंधावर अधिक भर द्या’’, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यांना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘डेल्टा’हून अधिक वेगाने संसर्गजन्य ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तित विषाणूची बाधा नागरिकांना होत असून, देशात २४ तासांमध्ये २ लाख ४७ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यांमधील करोनासंदर्भातील आरोग्यसुविधा व सुसज्जतेची माहिती घेतली.  राज्यांमधील टाळेबंदीसदृश्य निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारांमध्ये कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, आर्थिक घडामोडी व अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, असे मोदी म्हणाले. गृहविलगीकरणात जास्तीत जास्त व प्रभावी उपचार देता आले पाहिजेत. गृहविलगीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वेळोवेळी परिस्थितीनुसार बदल केला पाहिजे व त्यांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. उपचारांमध्ये टेली-मेडिसिनसारख्या सुविधांचाही वापर केला पाहिजे, असे सल्ले मोदींनी दिले.

लसीकरण हाच करोनाविरोधात लढण्याचा प्रभावी उपाय आहे. देशातील ७० टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले असून ९२ टक्के प्रौढांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये १५-१८ वयोगटातील ३ कोटी किशोरवयीन मुलांनाही लसमात्रा देण्यात आली आहे. संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम राज्यांनी अधिक तीव्रतेने राबवली पाहिजे, अशी सूचनाही मोदी यांनी केली.

शंभर वर्षांतील सर्वात घातक साथरोगाविरोधातील संघर्षांचे हे तिसरे वर्ष आहे. ओमायक्रॉनसारखा अधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या करोना विषाणूंचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. लक्षणे सौम्य असली तरीही जनतेने बेफिकीर राहू नये, त्यांनी दक्षता घ्यावी. पण, घाबरू नये, असे आवाहन मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. जिल्हा स्तरावर आरोग्य पायाभूत सुविधा, मुखपट्टीचा वापर आणि सौम्य प्रकरणांमध्ये गृहविलगीकरण आदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राज्यात वर्धक मात्रेला अल्प प्रतिसाद

मुंबई : राज्यात सोमवारपासून सुरू झालेल्या वर्धक मात्रेच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आह़े  दोन्ही मात्रा घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १९ लाख ६९ हजार असून, त्यातील केवळ दोन टक्के कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

लस बंधनकारक करा

मुंबई : लसमात्रा घेणे बंधनकारक करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याबाबत विचार करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुरुवारी बैठकीत केली. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत़  टोपे यांनी बैठकीत सहभागी होऊन करोनास्थितीबाबत माहिती दिली़ महाराष्ट्राला ४० लाख कोव्हॅक्सीन व ५० लाख कोव्हिशिल्डच्या लसमात्रा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली़

मोदी म्हणाले..

’१३० कोटी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांनी कोरोनाविरोधात विजयी होऊ.

’ओमायक्रॉनसंदर्भातील प्रारंभीच्या शंका हळूहळू दूर होत असून यापूर्वीच्या उत्परिवर्तित विषाणूंपेक्षा कितीतरी वेगाने हा विषाणू संक्रमित होत आहे.

’करोनाच्या भविष्यातील कोणत्याही उत्परिवर्तित विषाणूंविरोधात लढण्यासाठी तयार राहिले पाहिजे.

’‘हर घर दस्तक’ मोहिमेला आणखी गती दिली पाहिजे.

’दहा दिवसांत सुमारे ३ कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण झाले, या वेगावरून भारताची लसीकरणाची क्षमता व आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी दिसून येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi instruction state chief ministers for control of covid 19 zws
First published on: 14-01-2022 at 02:26 IST