PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला जाणार आहेत, अशी बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे, हे या भेटीमागील एक कारण असू शकते. परंतु यानिमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणे आणि व्यापाराबाबतचे मुद्दे सोडवणे आणि टॅरिफवर तोडगा काढणे, हे या भेटीमागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.

भारत आणि अमेरिकेमधील टॅरिफ वाद सोडविण्यासाठी इतर अनेक विषयांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. यातील पहिला विषय म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरा भारत-अमेरिकेदरम्यानचा व्यापार करार. १५ ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत या भेटीनंतर निर्णय होऊ शकतो. भारताचेही या भेटीकडे लक्ष लागले आहे.

मागच्या काळात पंतप्रधान मोदींनी पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या संघर्षाचा तोडगा काढणे हे भारताच्या हिताचे आहे, असा संदेश भारताकडून दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

अमेरिका आणि भारताच्या व्यापार कराराबाबतची वाटाघाटी जवळपास होत आली होती. त्यावर शिक्कामोर्तबही होणार होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या कराराबद्दल खूश नव्हते. त्यामुळेच यापुढे कराराची वाटाघाटी करताना करारांच्या अटींवर अधिक चर्चा करावी लागणार आहे. मात्र दोन्ही बाजूंनी द्वीपक्षीय व्यापारावर सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत द्वीपक्षीय व्यापारात ‘मिशन ५००’ म्हणजेच ५०० अब्ज डॉलर्स व्यापार करण्याचे ध्येय ठेवले आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात व्हाईट हाऊस येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी झालेली चर्चा फलदायी न ठरल्यामुळे आता पुन्हा एकदा व्यापार करारावर चर्चा करावी लागणार आहे.