पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे युक्रेनचे अनुभव सांगितले. पंतप्रधानांना भेटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीचे लोकही होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील इतर भागातील विद्यार्थ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने बोलताना दिसले. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढवण्यात आल्यापासून एकूण १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे.

“आपला देश मजबूत होणे हाच या सर्व समस्यांवर उपाय आहे. देशात आधीपासून वैद्यकीय शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर दुसऱ्या देशात जावे लागले नसते. कोणत्याही पालकांना आपल्या मुलांना एकटे दुसऱ्या देशात पाठवावे असे वाटत नाही. आधीच्या काळात ३०० ते ४०० वैद्यकीय महाविद्यालये होती. आता आपण ७०० महाविद्यालयापर्यंत पोहोचलो आहोत. खाजगी महाविद्यालयेही दुप्पट झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हा माझा प्रयत्न आहे. आम्ही जे प्रयत्न करोत आहोत त्यानुसार गेल्या ७० वर्षात जेवढे डॉक्टर बनले आहेत ते येत्या १० वर्षात तयार होतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतीयांना बाहेर काढण्यासाठी, सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत ८० उड्डाणे तैनात केली आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्वासन मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान या मुद्द्यावर महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी, मॉस्कोने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर तीन दिवसांनी, रशियन सैन्याने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली होती.