PM Modi Speech in NDA MP Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील एनडीएच्या खासदारांसमोर आज सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टिप्पणी करणारं भाषण केलं. या भाषणात त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेकदा कामकाज स्थगितदेखील करावं लागलं. यासंदर्भातही मोदींनी टीकात्मक भाष्य केलं. इंडियन एक्स्प्रेसनं मोदींनी एनडीएच्या खासदारांना नेमकं काय सांगितलं? यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
संसदेच्या दोन्ही सभागृहातील एनडीएच्या खासदारांसमोर केलेल्या या भाषणात मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. कधी चिमटे तर कधी थेट टीका करताना मोदींनी काँग्रेसच्या धोरणांना लक्ष्य केलं. “जे स्वत:चीच कबर खोदत आहेत, त्यांना आपण अडवायचं कशाला?” असा सवाल मोदींनी विरोधकांच्या संदर्भात एनडीएच्या खासदारांना उद्देशून केला. विरोधकांच्या संदर्भात एनडीएच्या खासदारांना उद्देशून केला. संसदेचं पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या गोंधळानंतर वारंवार स्थगित करावं लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या तीन आठवड्यात संसदेत एकही नवीन विधेयक पारित होऊ शकलेले नाही. या काळात संसदेत वारंवार पहलगाम दहशतवादी हल्ला व त्यानंतर राबवलेले ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरच सातत्याने चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याशिवाय, बिहारमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेवरदेखील राजकीय वाद चालू असून त्याचे पडसाददेखील अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेतील भाषणाच्या सुरुवातीबद्दल काय म्हणाले मोदी?
दरम्यान, या बैठकीत मोदींनी लोकसभेतील ऑपरेशन सिंदूरवरील आपल्या भाषणाची सुरुवात ‘मी देशाची बाजू मांडण्यासाठी उभा आहे’ असी करणं का महत्त्वाचं होतं, हे सांगितलं. एनडीएतील एका खासदारानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. त्यानुसार, अशी सुरुवात केल्यास अप्रत्यक्षपणे विरोधक भारताच्या विरोधी बाजू मांडत असल्याचा संदेश दिला गेला. याशिवाय मोदींनी खासदारांसमोर राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच फटकारल्याचाही उल्लेख केला.
विरोधक स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतायत – नरेंद्र मोदी
एनडीए एकत्र असून सर्वांनी जे करत आहात ते करत राहण्याचा संदेश मोदींनी दिल्याचं या खासदारानं सांगितलं. खासदारांनी सध्याच्या परिस्थितीत संसदेत जे चाललंय, त्याची काळजी करण्याची गरज नसून विरोधक स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाल्याचं य खासदारानं नमूद केलं.