गेल्या कित्येक वर्षांमध्ये भारतातील भ्रष्टाचाराची समस्या सुटू शकलेली नाही. केंद्रीय आणि राज्य पातळीवर सरकारे बदलल्यानंतरही ही समस्या मात्र तशीच राहिल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थेमध्येच अमूलाग्र बदल करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या (Central Vigilance Commission) नव्या वेबसाईटचं उद्घाटन केलं. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची गरज यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली.

“भ्रष्टाचार एक वाईट प्रवृत्ती आहे”

“भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून सगळ्यांनी दूर राहायला हवं. गेल्या आठ वर्षांत आम्ही ही संपूर्ण व्यवस्था ‘अभाव’ आणि ‘दबाव’ यापासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. “विकसित भारतात प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अजिबात चालवून घेतला जायला नको”, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

मोदींनी यावेळी उद्घाटन केलेल्या सीव्हीसीच्या नव्या संकेतस्थळावर नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. तसेच, अगदी सोप्या पद्धतीने त्यांच्या तक्रारींवर काय कार्यवाही करण्यात आली, तेही पाहाता येणार आहे.

पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

“भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळता कामा नये”

दरम्यान, भ्रष्टाचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळता कामा नये, असं मोदी यावेळी म्हणाले. “भ्रष्ट लोकांना कोणत्याही प्रकारे सूट मिळता कामा नये. त्यांना कोणतंही राजकीय किंवा सामाजिक संरक्षण मिळता कामा नये. शिवाय भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातली प्रक्रिया आपण आता निश्चित करायला हवी”, असंही मोदी म्हणाले.

दक्षता सप्ताहाचं आयोजन

केंद्रीय दक्षता आयोगाकडून भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग म्हणून ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यासाठी ‘विकसित देश होण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत’ या थीमवर आधारित उपक्रम राबवण्यात येणार आहेत.