PM Narendra Modi Applauds GST Rationalisation : वस्तू व सेवा कर परिषदेने (जीएसटी) कररचनेत फेरबदल करण्यास मान्यता दिली आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जीएसटीमधील बदलांचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले, “स्वतंत्र भारतात घेतला गेला हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे.” नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मोदी म्हणाले, “जीएसटी ही आता अधिक सोपी कररचना बनली आहे. जीएसटी परिषदेने घेतलेले निर्णय म्हणजे दिवाळीआधीचा डबल धमाका आहे.”

मोदी म्हणाले, “जीएसटी प्राणी आता खूप सोपी झाली आहे. आता केवळ दोनच टॅक्स स्लॅब उरले आहेत. केवळ ५ टक्के व १८ टक्के जीएसटी असे दोनच टॅक्स स्लॅब आहेत. यामुळे प्रत्येक व्यापारी व नागरिकाचं काम सोपं झालं आहे. जीएसटी २.० नावाची ही नवी व्यवस्था घरांमध्ये, छोटे व्यापारी आणि उद्योगांना दिलासा देणार आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले?

पंतप्रधान म्हणाले, “जीएसटी परिषदेने १२ टक्के व २८ टक्के हे दोन टॅक्स स्लॅब हटवले आहेत. आता केवळ ५ टक्के व १८ टक्के टॅक्स स्लॅब आहेत. जीएसटीमधील नवे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होतील. २०१७ मध्ये लागू झाल्यानंतर जीएसटीमधील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल आहेत. ज्या वस्तू व सेवा पूर्वी उच्च करांच्या स्लॅबमध्ये होत्या त्या आता ५ टक्के किंवा १८ टक्केवाल्या स्लॅबमध्ये येतील. यामुळे गरजेच्या वस्तू, पर्सनल केअरच्या वस्तू, रेस्तराँमधील जेवण, प्रवास, गॅझेट्स आणि गाड्या स्वस्त होणार आहेत.”

आता फिटनेसच्या क्षेत्रातही मोठा बदल होणार असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले, “आपल्या तरुणांना सुखावणारे निर्णय घेण्यात आले आहेत. जिम (व्यायामशाळा), सलॉन, योगासारख्या सेवांवरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आपली तरुणाई आता हिट आणि फिट होणार आहे.

मोदी यांची काँग्रेसवर टीका

दरम्यान, मोदी यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. “मी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी, स्वयंपाकघरातील भांडी असोत किंवा शेतीच्या वस्तू असोत, औषधे असोत किंवा अगदी जीवन विमा असोत, काँग्रेस सरकारने अशा विविध गोष्टींवर वेगवेगळे कर लादले होते. आम्ही त्यात आता सुसूत्रता आणली आहे.”