गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व अमेरिकेतील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला कारण ठरला अमेरिकेकडून करण्यात आलेला एक गंभीर दावा. एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा केला असताना दुसरीकडे अमेरिकेनेही आपल्या भूमीत शीख फुटीरतावाद्याच्या हत्येचा कट रचण्यात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप केला. यामुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे.

अमेरिकेत खलिस्तानवादी फुटीर नेत्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात एका भारतीय व्यक्तीला अटकदेखील करण्यात आली असून त्यानं भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचा दावाही अमेरिकेतील तपास यंत्रणांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे हा थेट भारतावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप मानला जात असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची तयारी दर्शवली आहे. “जर कुणी यासंदर्भातले पुरावे सादर केले, तर मी नक्कीच या प्रकरणात लक्ष घालेन. जर भारताच्या कुठल्या नागरिकाकडून काही चांगलं किंवा वाईट घडलं असेल, तर आम्ही त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी तयार आहेत. कायद्याच्या राज्यासाठी आम्ही बांधील आहोत”, असं मोदी या मुलाखतीमध्ये म्हणाले. मात्र, “विदेशात आश्रय घेऊन राहणाऱ्या व्यक्तींकडून देशविरोधी कारवाया केल्या जात असून त्याची आपल्याला चिंता आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी नमूद केलं. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या घटकांकडून हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं जात आहे”, असं ते म्हणाले.

अमेरिकेचे भारताकडे बोट; शीख अतिरेक्याच्या हत्येचा कट; भारतीय व्यक्तीविरोधात गुन्हा

द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होणार?

दरम्यान, अमेरिकेच्या आरोपांमुळे भारत व अमेरिकेतील संबंध ताणले जाणार असल्याची शक्यता मोदींनी फेटाळून लावली. “अशा काही प्रकरणांमुळे भारत व अमेरिकेतील संबंधांवर परिणाम होणार नाही. हे संबंध सुदृढ व्हावेत यासाठी दोन्ही बाजूंनी पूर्ण पाठबळ दिलं जात आहे. हे एक प्रगल्भ आणि स्थिर भागीदारीचं लक्षण आहे. संरक्षण व दहशतवादविरोधी लढ्याबाबतचं सहकार्य हे आमच्या मैत्रीचे महत्त्वाचे घटक आहेत”, असं नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेत हत्येचा कट करण्यात आलेली शीख फुटीरतावादी व्यक्ती म्हणजे खलिस्तानवाद्यांचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नू हाच असल्याचं सांगितलं जात आहे. गुरपतवंतसिंग पन्नू सातत्याने व्हिडीओ व सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताला जाहीरपणे खलिस्तानच्या मुद्द्यांवरून धमकी देत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.