मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. या प्रकरणावर केंद्र सरकारने सभागृहात चर्चा करावी, यासाठी विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात अविश्वास प्रस्तावावर बोलत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार टोलेबाजी केली. विरोधी पक्षाला गुप्त वरदान मिळालं आहे. ते ज्यांचं वाईट चिंततात, त्यांचं चांगलंच होतं, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं. यावेळी त्यांनी तीन उदाहरणंही दिली आहेत.
अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सदनात काही गुप्त सांगू इच्छित आहे. माझा विश्वास बसलाय की विरोधी पक्षाच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळालं आहे. त्यांचं वरदान हे आहे की, हे लोक ज्याचं वाईट चिंततील, त्याचं चांगलंच होतं. एक उदाहरण तर तुमच्यासमोर उभं आहे. २० वर्षं झाली. यांनी काय काय केलं नाही. पण माझं भलंच होत गेलं. त्यामुळे विरोधकांना हे गुप्त वरदान आहे, यावर विश्वास बसतो.”
हेही वाचा- “किरीट सोमय्यांचं इतकं घाण प्रकरण…”, राहुल गांधींच्या ‘फ्लाइंग किस’वरून खैरेंची स्मृती इराणींवर टीका
“विरोधकांना गुप्त वरदान मिळालं आहे, हे मी तीन उदाहरणांमधून सिद्ध करू शकतो. विरोधकांनी बँकिंग क्षेत्राबद्दल म्हटलं होतं की, हे क्षेत्र बुडेल. देश बरबाद होईल. ते मोठं-मोठ्या विद्वानांना विदेशातून बोलवायचे. त्यांच्या तोंडून हे बोलायला लावायचे. कारण याचं कुणी ऐकलं नाही तर किमान त्यांचंतरी ऐकतील. यांनी बँकिंग क्षेत्रांबद्दल अफवा पसरवण्याचं काम केलं. बँकिंग क्षेत्राबद्दल वाईट चिंतलं. पण बँकिंग क्षेत्राचा निव्वळ नफा दुप्पट झाला. एनपीए पूर्ण कमी करून नव्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे” असं नरेंद्र मोदींनी सभागृहात सांगितलं.
“दुसरं उदाहरण म्हणजे हे एचएएलवर बऱ्याच वाईट गोष्टी हे बोलले. एचएएल उद्ध्वस्त झालंय असं सांगितलं गेलं. आजकाल शेतांमध्ये जाऊन व्हिडीओ शूट केले जातात. तसेच त्या वेळी एचएएल कंपनीच्या दरवाज्यावर कामगारांची सभा घेऊन व्हिडीओ शूट केला होता. कामगारांना भडकवण्यात आलं होतं. पण आज HAL यशस्वी झालं. एचएएलने महसूल गोळा करण्याच्या बाबतीत उच्चांक नोंदवला आहे. एचएएल ही आता देशाची शान बनत आहे,” असंही मोदी म्हणाले.
हेही वाचा- “गौतम अदाणींसाठी मणिपूरमध्ये…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर खळबळजनक आरोप
तिसरं उदाहरण देताना मोदी म्हणाले, “विरोधकांनी एलआयसीबाबतही असेच दावे केले गेले. पण आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना हा गुरुमंत्र आहे. ज्या सरकारी कंपनीवर विरोधक आरोप करतील. त्यात तुम्ही गुंतवणूक करून टाका. हे लोक ज्या संस्थांच्या मृत्यूची घोषणा करतात. त्या संस्थांचं भाग्य चमकतं.”