पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आगामी राष्ट्रपतीपदासाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. बच्चन कुटुंबियांचे एकेकाळेच निकटवर्तीय व समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. याशिवाय यासंदर्भात आपण केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकरवी मोदींना भेटल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरसिंह यांनी ‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ आणि मोदींची पहिली भेट मीच करून दिल्याचे सांगितले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘पा’ चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतरच अमिताभ यांच्यासमोर गुजरातच्या ब्रँड अँम्बेसिडरपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असा दावा अमरसिंह यांनी मुलाखतीदरम्यान केला. काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील अमिताभ बच्चन हेच पुढील राष्ट्रपती असतील, असे भाकीत वर्तविले होते.
विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.