लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. आज (१५ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील अलाथूर, पलक्कड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख ‘युवराज’ असा करत उत्तर प्रदेशातील जागा वाचवू न शकल्यामुळे आता केरळमध्ये आले आहेत, असा टोला लगावला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसच्या युवराजांना उत्तर प्रदेशात आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवणे कठीण झाले. त्यामुळे त्यांनी केरळमध्ये आपले नवे तळ बनवले आहे. काँग्रेसने येथून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी देशविरोधी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसोबत राजकीय चर्चा केली. निवडणुकीत काँग्रेसचे युवराज केरळच्या लोकांकडून मते मागतील. मात्र, येथील जनतेच्या प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाहीत”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : पुढची निवडणूक ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले…

मोदींचा डाव्या सरकारांवर निशाणा

“एलडीएफ-यूडीएफपासून सावधान राहिले पाहिजे. हे केरळची स्थिती बिघडवत आहेत. केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या करुवन्नूर को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यावर राहुल गांधी काही बोलत नाहीत. हे मला (नरेंद्र मोदी) रोखण्यासाठी भ्रष्ट युती करत आहेत. पण मी त्यांना घाबरत नाही. केरळमधील नैसर्गिक सौंदर्य सर्वांना भुरळ घालते. केरळमध्ये अनेक मंदिरे आहेत. येत्या पाच वर्षांत आम्ही केरळला महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांचे जाळे उभे करु”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.