Narendra Modi On Red Fort Metro Station Delhi Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून इतर १२ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर त्या परिसरातील जवळच्या काही वाहनांनी देखील पेट घेतल्याची माहिती समोर आली. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच आपण सर्व परिस्थितीचा आढावा घेत असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला, असे वृत्त सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिले. दरम्यान अमित शाहांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना या स्फोटाबद्दल माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं?

“लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे. हा स्फोट कसा झाला आणि त्यामागे काही मोठं षड्यंत्र आहे का? याची चौकशी पोलीस आणि सरकारने तातडीने करावी. दिल्लीच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा सहन केला जाऊ शकत नाही”, असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.